विरार : विरार (Virar) पूर्वेला असणाऱ्या सी एम नगर येथील दादू प्लाझा इमारतीमध्ये एका घरातील स्लॅप कोसळून तरुणीची मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवार (01 नोव्हेंबर) रोजी पहाटे ही घटना घडली. दरम्यान शितल शिवाजी पवार असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. पहाटे 3.30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. दरम्यान घटना घडल्यानंतर ती तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादम्यान तिचा मृत्यू झाला. 


शितल बेडरुममध्ये झोपलेली असतानाच तिच्या अंगावर स्लॅब कोसळला. त्यानंतर तात्काळ तिला विरार पूर्वेच्या चंदनसार येथील श्री जीवदानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान शितलचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिच्या नातेवाईकांनी विरार पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान दादू प्लाझा ही इमारत दहा वर्षे जुनी असून अनधिकृतपणे बांधण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. 


इमारत अनधिकृत असल्याचं समोर


दरम्यान ही इमारत अनधिकृत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे या इमारतीमधील इतर रहिवाश्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या इमारतीचे बांधकाम ज्यांनी केले त्यांच्यावर कोणती कारवाई होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 


वसईमध्ये दुर्दैवी अपघात


वसईच्या अग्रवाल प्लाझा नाक्यावर एक दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. गुरुवार (2 नोव्हेंबर) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास वसईच्या अग्रवाल प्लाझा नाक्यावरुन पालिकेची कचरा उचळणारी गाडीने राजेश मोरे या पालिकेच्या कर्मचा-याला चिरडलं . आज दुपारी ते जेवण्यासाठी घरी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. वसई विरार पालिकेच्या चिंचोटी कार्यालयात मयत राजेश मोरे हे कर्मचारी होते. वसई विरार पालिकेच्या कचरा उचलणा-या गाड्यांबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. पालिकेच्या कचरा उचलणा-या गाड्या सुस्थितीत नसतात, वाहनचालक शहरात मुजोरपणे गाडी चालवत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. 


दरम्यान याबाबत आता प्रशासन कोणती कठोर पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच मुजोरपणा करणाऱ्यावर देखील कोणती कारवाई केली जाणार हे देखील पाहणं गरजेचं ठरेल. 


हेही वाचा : 


Bhiwandi News : भिवंडीत सोनसाखळी चोरट्यांना अटक, कुरिअर बॉय आणि सेल्समन निघाले अट्टल चोरटे