विरार : विरारमध्ये 19 वर्षाच्या तरुणीला धावत्या लोकलमधून फेकल्याची घटना घडली आहे. कोमल चव्हाण असं तरुणीचं नाव असून ती या घटनेत जखमी झाली आहे.

कोमल चव्हाण गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास कामावरुन घरी नालासोपाऱ्याला जात असताना हा प्रकार घडला. कोमल महिलांच्या डब्यात बसली होती. ट्रेन सुरु होताच एक व्यक्ती त्या डब्यात चढला आणि कोमलकडे पैसे मागू लागला. घाबरलेल्या कोमलने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्या व्यक्तीने  कोमलला धावत्या ट्रेनमधून ढकललं आणि स्वत:ही खाली उतरला.

कोमलवर सध्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या खांद्याला जबर दुखापत झाली असून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.


विशेष म्हणजे ज्यावेळी कोमल महिलांच्या डब्ब्यात चढली, त्यावेळी ती तिथे एकटीच होती. शिवाय पोलिस कर्मचारीही तिथे नव्हता. एखादा पोलिस त्या डब्ब्यात असता तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती.

धक्का मारणारा आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेची काही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.