मुंबई : मुंबईमधील घाटकोपरच्या (Mumbai Ghatkopar Car) राम निवास इमारतीच्या अंगणात असलेल्या विहिरीमध्ये पडलेली कार अखेर 12 तासानंतर बाहेर काढण्यात आली आहे. या ठिकाणी चाळीस फूट खोल पडलेली ही गाडी बाहेर काढण्यास अखेर यश आले आहे. सकाळपासून या विहिरीमधील लाखो लिटर पाणी उपसल्यानंतर अखेर क्रेनच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्यात आली आणि स्थानिकांनी टाळ्यांच्या गजरात आपला आनंद व्यक्त केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कारमध्ये एक दोन ते तीन फुटाचा मासा देखील आढळून आला.
नेमकं काय घडलं होतं
घाटकोपरच्या राम निवास बिल्डिंगसमोर नौरोजी लेन येथे तपन किरण दोषी यांची मोटार कार चक्क स्लब तोडून खाली भूमिगत केलेल्या विहिरीत पडल्याची घटना आज घडली. गाडी विहिरीवर असलेल्या स्लॅबवर पार्क केली होती. ही गाडी आज सकाळी 8.30 च्या सुमारास गाडी स्लॅब खचल्याने 40 फुट खोल विहिरीमधे पडली. ( Ghatkopar Car sinking in Well) या घटनेत कुणी जखमी वगैरे झालं नाही. ही गाडी ज्यांची होती त्यांनीच गाडी बुडतानाचा हा व्हिडीओ बनविला होता. हा व्हिडीओ समाजमाध्यमावर तुफान व्हायरल झाला. ट्विटरवर घाटकोपर हे नाव देखील या व्हिडीओमुळं ट्रेंडिंगला आलं होतं. माहितीनुसार घाटकोपरमध्ये या विभागात अश्या प्रकारे अनेक विहिरी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ही विहीर देखील खूप वर्ष जुनी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
बीएमसीनं काय दिलं स्पष्टीकरण
या घटनेचा व्हिडीओ आल्यानंतर काही यूजर्सनी मुंबई महापालिकेला याबाबत विचारणा केली. यावर BMC नं ट्विट करत सांगितलं की, घाटकोपरमधील कारच्या या घटनेशी महानगरपालिकेचा दुरान्वयानेही संबंध नाही. ही खासगी सोसायटी परिसरातील घटना आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर या अनुषंगाने मदत कार्य म्हणून महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाद्वारे पाणी उपसण्याच्या कामाचे समन्वयन करण्यात येत आहे. तसेच सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाय योजना तातडीने करण्यास संबंधित सोसायटीला सूचित करण्यात आले आहे, असं बीएमसीनं सांगितलं.