मुंबई : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा रविवारी वाढदिवस होता. कोरोनाची परिस्थिती पाहाता वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी गर्दी न करण्याची विनंती आदित्य ठाकरेंनी केली होती. यामुळे शिवसैनिकांनी त्यांच्या भागात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आदित्य यांचा वाढदिवस साजरा केला. मात्र, या कार्यक्रमांच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयारी सुरु केल्याचं बोललं जात आहे.




कांदिवली पूर्वेकडील ठाकूर व्हिलेजमधील शिवसेनेचे आनंद दुबे यांनी लोकांना उपयोगी पडतील अशा गोष्टींचं वितरण केलं. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी गरजेच्या असलेल्या मास्क, सॅनिटायझर आणि ग्लोव्हजचं दुबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाटप केलं. वाढदिवसाच्या निमित्ताने या गोष्टींचं वाटप करत असताना दुबे यांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयारी सुरु केल्याचंही बोललं जात आहे. उत्तर भारतीय मतदार आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दुबे यांना शिवसेनेने आगामी महापालिका निवडणुकीत पुढे केल्यास ते सहज निवडून येऊ शकतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटतोय.




आदित्य ठाकरे यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सगळ्या शिवसैनिक, युवासैनिक आणि समर्थकांना आवाहन केलं होतं, की शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गर्दी करू नये. त्यांनी एक ट्विट केलं होतं, ज्यात त्यांनी म्हटलं होतं की "मागील वर्षापासून आपण कोरोनाच्या महासंकटाशी लढत आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. आपल्याला आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. मास्क लावणे, अंतर पाळणे, गर्दी होऊ न देणे हा या आजाराला हरवण्याचा हमखास उपाय आहे. त्यामुळेच यंदा माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम, सोहळा करण्याचे टाळत आहे" होर्डींग, केक, हार अशा गोष्टींवर खर्च न करता कोरोनाला हरवण्यासाठी नियम पाळणे आणि इतरांना शक्य होईल ती मदत करणे हीच आपल्यासाठी वाढदिवसाच्या भेट असेल असेही आदित्य यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले होते. यामुळे आनंद दुबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोनाला दूर ठेवण्यासाठी गरजेच्या असलेल्या गोष्टींचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता.