मुंबई : महिला सुरक्षेचा मुद्दा नेहमीच गंभीर समजला जातो. महिलांशी संबंधित गुन्हे पाहता याबाबत आज विविध प्रकारच्या मोबाईल अॅपपासून हेल्पलाईन नंबर उपलब्ध आहेत.
पण सध्या सोशल मीडियावर महिला सुरक्षेसंदर्भात एक विशेष मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये एक नंबर देऊन सांगितलं जातं की, महिला टॅक्सी किंवा रिक्षात प्रवास करत असतील तर त्यांनी तातडीने आपला मोबाईलनंबर संबंधित नंबरवर पाठवावा. या नंबरवर मेसेज करताच, महिला निश्चित स्थळी सुरक्षित पोहोचेपर्यंत त्या परिसरातील पोलिस त्यांच्यावर जीपीआरएसद्वारे देखरेख ठेवतात, असा दावा केला जातो.
मागील काही काळापासून व्हायरल होणारा हा मेसेज खरा मानून अनेक महिला आणि विद्यार्थिनी त्यांची माहिती संबंधित नंबरवर (9969777888) शेअर करतात. पण या मेसेजचं सत्य काय आहे?
व्हायरल मेसेज पूर्णत: खोटा
होय, हा मेसेज पूर्णत: खोटा आहे. या मेसेजबाबत अधिक छाननी केली असता हा फेक मेसेज असल्याचं समोर आलं आहे. या मोबाईल नंबरवरुन जीपीआरएसद्वारे देखरेख होत नाही. 9969777888 हा मोबाईल नंबर मुंबई पोलिसांचा असल्याचं मेसेजमध्ये सांगितलं आहे. परंतु मुंबई पोलिसांनी महिला सुरक्षेबाबत एका टेलिकॉम कंपनीसोबत मिळून हा हेल्पलाईन नंबर 2014 मध्ये सुरु केला होता. पण त्याचा गैरवापर करुन कोणीतरी या नंबरसोबत मेसेज करुन व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर शेअर केला.
या नंबरवर मेसेज केल्यास काय होतं? या नंबरवर मेसेज केल्यास 100 नंबर डायल करण्याचे सांगितलं जातं. त्यामुळे अशाप्रकारचा कोणताही नंबर सध्या उपलब्ध नाही.
पोलिसांकडे अशी सिस्टम नाही!
मात्र सोशल मीडियावर दरदिवशी अशाप्रकारचे खोटी माहिती असलेले मेसेज व्हायरल केले जातात. पण महिला सुरक्षेसारखा गंभीर विषय असल्याने अनेक जण हे मेसेज खरं असल्याचं समजून शेअर करतात. मात्र पोलिसांकडे अशी कोणतीही सिस्टम नाही की, ते संबंधित नंबरवर पाठवलेल्या मेसेजवरुन जीपीआरएसद्वारे महिलांवर देखरेख ठेवू शकतील. त्यामुळे हा व्हायरल मेसेज पूर्णत: चुकीचा आहे.
महिलांसाठी एफआरआय अॅप
दरम्यान, महिलांसाठी अनेक शहरांच्या पोलिसांकडून एफआयआर अॅपच्या रुपाने एक चांगली सुविधा उपलब्ध केली आहे. कोणतीही महिला किंवा विद्यार्थिनी हे अॅप तिच्या स्मार्टफोनमध्ये सहजरित्या आणि मोफत डाऊनलोड करुन वापरु शकते. आपत्कालीन परिस्थितीत अॅपमधील हेल्प बटणवर क्लिक करताच कंट्रोल रुममध्ये तुमच्या मोबाईलचं लोकेशन पोहोचतं. यानंतर दोन मिनिटांतच कंट्रोल रुममधून संबंधित महिलेला कॉल बॅक येतो. सोबतच जवळच्या पीसीआरलाही याबाबत सूचना दिली जाते. वुमन हेल्पलाईन 1091 आणि 100 हा दुसरा पर्याय सगळ्यांसाठीच उपलब्ध आहे.