मुंबई : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनी काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण पत्करलं. देशासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या या वीरपुत्राच्या हौतात्म्याचा आदर करण्याऐवजी काही जण या परिस्थितीचा गैरफायदा उठवताना दिसत आहेत. शहीद कौस्तुभ यांच्या पत्नीच्या नावे फेक ऑडिओ क्लिप वायरल करण्यात आली आहे.

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावे एक खोटी ऑडिओ क्लिप तयार करुन ती सोशल मीडियावर वायरल करण्याली आहे. त्यामुळे शहीद मेजर कौस्तुभ यांच्या पत्नीसह कुटुंबियांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. मात्र ती ऑडिओ क्लिप आपण केली नसल्याचं स्पष्टीकरण वीरपत्नी कनिका राणे यांनी दिलं आहे.

शहीद कौस्तुभ यांच्या निधनाने बसलेल्या धक्क्यातून अद्याप आपण सावरलेलो नाही. अशाप्रकारे पत्र लिहावं किंवा क्लिप तयार करावी असं आमच्या मनातही आलं नाही. कुठलीही ऑडिओ क्लीप तयार करण्याची आपली मनस्थिती नसल्याचं कनिका सांगतात.

दुसरीकडे, काही जणांनी सोशल मीडियावर आव्हान करत शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या नावे निधी जमवण्यास सुरुवात केली आहे. शहीद मेजर कौस्तुभ यांच्या कुटुंबियांना मदत करायची असल्याचं सांगत काही जण पैसे उकळत असल्याचं समोर येत आहे. याही प्रकारामुळे शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या कुटुंबीयांना अत्यंत दुःख होत आहे.

अशाप्रकारे कुठलाही निधी आपण जमवत नाही. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्याचा गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न कृपया करु नये, अशी कळकळीची विनंती राणे कुटुंबाने केली आहे.

व्हॉट्सअॅप, फेसबुक सारख्या सोशल मीडियावर शहीद कौस्तुभ राणे यांची पत्नीचं मनोगत म्हणून काही मेसेज आणि ऑडिओ क्लिप वायरल होत आहेत. ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या महिलेचा आवाज शहीद कौस्तुभ राणे यांच्या पत्नीचा नाही. सदर ऑडिओ क्लिप आल्यास ती कोणालाही फॉरवर्ड किंवा शेअर करु नये. शहीद कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. क्लिप व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी बजावलं आहे.