आपला हरवलेला मोबाईल पोलिस नाही, तर आपण स्वतःच शोधू शकतो यावर तुमचा विश्वास बसतो का? निदान तसा प्रयत्न तर आपण नक्कीच करु शकतो. मुंबईतील मरोळ भागात राहणाऱ्या झीनतने हा प्रयत्न केला आणि तिला तिचा मोबाईल मिळाला.
मोबाईल चोर शहर सोडून बाहेरगावी पलायन करणारच होता, तितक्यात आरपीएफने त्याला जेरबंद करुन दादर जीआरपी चौकीकडे सोपवलं. 32 वर्षी सेल्वाराज शेट्टी याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कसा शोधला फोन?
19 वर्षांची झीनत बानो हक एका शाळेत शिक्षिका आहे. गेल्या रविवारी ती कामानिमित्त मालाडला गेली होती. घरी परत येताना आपला अँड्रॉईड फोन हरवल्याचं तिच्या लक्षात आलं. मात्र फोन नेमका कसा, कुठे चोरीला गेला, हे तिच्या ध्यानात येत नव्हतं.
झीनतने आपल्या दुसऱ्या अँड्रॉईड फोनवरुन गुगल अकाऊण्ट लॉगइन केलं. त्यावरुन तिने हरवलेल्या फोनची अॅक्टिव्हिटी ट्रॅक केली. मोबाईलमध्ये असलेल्या 'माय अॅक्टिव्हिटी' या ऑप्शनमधून तुम्ही आपल्या अकाऊण्टमध्ये लॉगइन करुन दुसऱ्या मोबाईलवर पाहिले गेलेले व्हिडिओ, वेबसाईट आणि इतर सर्चबद्दल माहिती घेऊ शकतं.
चोराने रजनीकांतचा काला चित्रपटातील गाणी सर्च केली. त्यानंतर शेअर इट अॅप वापरलं. व्हॉट्सअॅप, फेसबुक ही अॅपही अपडेट केली. त्यानंतर चोराने रेल्वे तिकीट बुकिंग अॅप डाऊनलोड केलं.
चोराने दादर-तिरुवंतमलई रेल्वे तिकीट बुक केलं आणि त्याचा स्क्रीनशॉट घेतला. विशेष म्हणजे चोराने स्वतःचाही फोटो मोबाईलवर क्लिक केला. गुगल फोटोजमधून झीनतने चोराचा फोटो आणि रेल्वे तिकीटाचे तपशील मिळवले. पुद्दुचेरी एक्स्प्रेस रविवारी रात्री 9.30 वाजता दादरवरुन निघत असल्याचं तिला समजलं.
झीनतने दादर स्टेशन गाठून जीआरपींना ही माहिती दिली. ट्रेन येताच आरपीएफ संबंधित सीट नंबरवर गेले, तिथे आलेल्या व्यक्तीकडे झीनतचा चोरीला गेलेला फोन सापडला.