मुंबई : प्रलंबित प्राध्यापक भरतीसाठी आचारसंहितेचा बागुलबुवा करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी जबाबदार धरलं आहे. 'एबीपी माझा'च्या तोंडी परीक्षा विशेष कार्यक्रमात विनोद तावडे बोलत होते. कार्यक्रमात विनोद तावडेंनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. लोकसभेसाठी लागू झालेली आचारसंहिता प्राध्यापक भरतीसाठी अडसर ठरता कामा नये, असं मत विनोद तावडेंनी मांडलं. यासंदर्भात मी मुख्य सचिवांना पत्र लिहिलं असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. शालेय भरती प्रक्रिया आचारसंहितेआधी सुरु झाली आहे, त्यामुळे ती थांबण्याची गरज नाही. येत्या दोन-तीन दिवसात ही प्रक्रिया पुन्हा सुरु होईल, असं आश्वासन विनोद तावडेंनी यावेळी दिलं.


शरद पवारांनी काल साताऱ्याच्या सभेत 56 इंच छातीवाले पंतप्रधान पाकिस्तानात कैद असलेल्या कुलभूषण जाधव यांना भारतात का आणत नाहीत? असा सवाल केला होता. पवारांच्या वक्तव्यावर बोलताना विनोद तावडेंनी म्हटलं की, पाकिस्तान सरकारनं कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा दिली होती. मात्र भाजप सरकारने आतंरराष्ट्रीय न्यायालयात जाऊन त्यांची शिक्षा स्थगित केली. कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी देशातील प्रख्यात वकील नेमून त्यांना मुक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. उलट प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा आधार घेत, दाऊद इब्राहिम भारतात परतण्यास तयार आहे, मात्र शरद पवार त्याला येऊ देत नाहीत, असा आरोप विनोद तावडेंनी केला.



शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना, काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने शेतकऱ्यांना 9 हजार कोटी रुपये दिले होते. मात्र भाजप सरकारने साडेचार वर्षात 28 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती विनोद तावडेंनी दिली. शेतकऱ्यांसाठी हितासाठी विविध योजना भाजप सरकारने आणल्या आहेत, असंही तावडे म्हणाले.


भाजप 'मुलं पळवणारी टोळी' या विरोधकांच्या टीकेलाही विनोद तावडेंनी उत्तर दिलं. ज्या पालकांना कतृत्ववान मुलांना सांभाळता येत नाही, ती मुलं आज कतृत्ववान पालकांकडे येत आहेत. पक्षाच्या भिंती आम्ही मानत नाही, जे समाजात चांगलं आहे, देशाचा विकास करण्यासाठी जे चांगले आहेत, त्यांना आम्ही पक्षात घेत आहेत. तसेच उरलेले नेते काँग्रेसमध्ये का उरलेत? अशी खोचक टीकाही विनोत तावडेंनी केली आहे.


काँग्रेसमध्ये सध्या अशोक पर्व नाही तर 'शोक' पर्व सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी स्वताच त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल केली आणि हायकमांडवर दबाव टाकला, असा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केला आहे. अशोक चव्हाण नाराज असून ते राजीनाम्याच्या तयारीत असल्याच्या संदर्भात त्यांची एक ऑडिओ क्लिप नुकतीच वायरल झाली होती. काँग्रेस हायकमांडवर दबाव टाकून तिकीट बदलायला लावण्यासाठी ही क्लिप अशोक चव्हाण यांनी स्वतःच रेकॉर्ड करायला सांगितली आणि व्हायरल केली आहे, असा आरोप विनोद तावडे यांनी केला आहे. तसेच अब्दुल सत्तार हे चव्हाणांच्या जवळचे असून त्यांच्याच सांगण्यावरुन सत्तार यांनी राजीनामा दिला आहे, असं देखील तावडे म्हणाले.


पुलवामा हल्ल्यानंतर विरोधकांच्या भूमिकेवरही तावडेंनी टीका केली. देशात जीएसटी, नोटाबंदी असे विविध मुद्दे आहेत, त्यावर विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारायला हवेत. मात्र सैनिकांनी केलेल्या पराक्रमाबाबत संशय व्यक्त करु नये. 26/11 हल्ला झाला त्यावेळीही सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करण्याचं म्हटलं होतं, मात्र आघाडीच्या सरकारने तसं पाऊल उचललं नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्याची हिंम्मत भाजप सरकारने दाखवली, ते मान्य केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक नसेल करायचं तर नका करु, मात्र सैनिकांचा अपमान करु नका, असं आवाहन विनोद तावडेंनी विरोधकांना केलं.


गुण


सविस्तर उत्तरे- 10 पैकी 7 गुण


संदर्भासहित स्पष्टीकरण- 10 पैकी 6 गुण


एका वाक्यात उत्तरे - 10 पैकी 8 गुण


कल्पनाविस्तार - 10 पैकी 7 गुण


योग्य पर्याय निवडा- 10 पैकी 8 गुण


कोण कोणास म्हणाले? - 10 पैकी 6 गुण


एकूण 60 पैकी 42 गुण