मुंबई : बातमी मुंबई पोलिसांची मान उंचावणारी आहे. मुंबईतील विलेपार्ले पोलीस स्टेशनला मार्च महिन्यासाठी "सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत" पुरस्कार मिळाला आहे. फेब्रुवारी महिन्यात विलेपार्ले पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीची एक घटना घडली होती. ज्यामध्ये 21 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. घरात कोणीही नसताना चोरटे घराचं टाळं तोडून आत शिरले आणि चोरी करून पसार झाले होते. चोरी इतक्या हातसफाईने केली होती की, चोरीचा कुठलाही पुरावा त्यांनी सोडला नव्हता.

Continues below advertisement


मुंबईतील विलेपार्ले परिसर हा शांत आणि सुसंस्कृत लोकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे चोरीच्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ घडलेल्या घटनेसंदर्भात गुन्हा नोंदवला. कुठला ही पुरावा नसताना सुद्धा अतिशय कसोशीने या चोरीच्या प्रकारणाचा तपास पोलिसांनी सुरु केला.


पोलीस उपायुक्त मंजूनाथ शिंगे यांच्या आदेशानुसार, विलेपार्ले पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलका मांडवे यांच्या नेतृत्वाखाली या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आलं. पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक नेमण्यात आलं. तपास करत असताना गुप्त माहितदारांकडून छोटासा सुगावा पोलिसांना लागला. तोच धागा धरत साहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर डोईजड यांनी अतिशय सखोल निरिक्षण करून सर्व केंद्रबिंदू जोडले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर डोईजड आपल्या सोबत पोलीस नाईक पडवळ, महाडेश्वर, पोलीस शिपाई कांबळे यांना घेऊन उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाले. तिथून विकास उर्फ राजा अनिल सिंह आणि अंगद कश्यप या आरोपींना अटक करत त्यांच्याकडून 18 लाख 17 हजार 200 रुपयांचा मुद्देमाला आणि रक्कम जप्त केली.


कुठला ही सुगावा नसतानासुद्धा केलेल्या या तपासाबद्दल वरीष्ठ पोलीस निरीक्षक अलका मांडवे, पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर डोईजड, पोलीस नाईक पडवळ, महाडेश्वर नई पोलीस शिपाई कांबळे यांना रोख रक्कम 15 हजार आणि प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं.