Vikroli Landslide News : इर्शाळवाडीत (Irshalwadi) दरड दुर्घटना घडल्यानंतर मुंबईतील (Mumbai) दरडप्रवण क्षेत्राचा मुद्दा ऐरणीवर आल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही (Assembly Monsoon Session) योग्य पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण तरीही अनेक लोकं धोकादायक परिस्थितीमध्ये मुंबईत राहत आहेत. विक्रोळीतील सूर्यनगर आणि सिद्धार्थ नगर परिसरातील जवळपास 3 ते 4 हजार नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचं म्हटलं जात आहे.
मागील दोन आठवड्यांमध्ये तीन वेळा दरडी कोसळण्याच्या घटना या परिसरामध्ये घडल्या आहेत. यामध्ये काही घरांचं नुकसान देखील झालं आहे. सिद्धार्थ सुरसे या गृहस्थांच्या घरात थेट दरड कोसळली आहे. तर मागील आठवड्यात कविता रेड्डी यांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या घरावर दरड कोसळली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या मनात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच या भागात पालिकेकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे विक्रोळीतील सूर्यनगरच्या डोंगराळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी ही धोक्याची घंटा तर नाही ना हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
पुन्हा होणार 2021 ची पुनरावृत्ती ?
विक्रोळीतील डोंगर हा अतिशय भुसभुशीत झाला आहे. पाय ठेवताच पाय देखील आतमध्ये जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या भागामध्ये पुन्हा पुनरावृत्ती होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्यातच विक्रोळीतील या डोंगराळ भागातील संरक्षण भिंतच कोसळली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच पालिकेकडून अद्यापही येथील नागरिकांचे स्थलांतर झाले नाही. त्यामुळे आपत्तीच्या वेळी कुठे जायचं हा प्रश्न येथील नागरिकांच्या समोर निर्माण झाला आहे.
काय घडलं होतं 2021 मध्ये?
विक्रोळीतील या भागामध्ये 2021 साली दरड कोसळली होती. या दुर्घटनेमध्ये 11 अकरा जणांचा मृत्यू झाला होता. ज्या जागी ही दुर्घटना घडली होती त्या ठिकाणावरील भिंत देखील तुटली आहे.त्यामुळे पुन्हा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सोबतच नव्याने बांधण्यात आलेली भिंत देखील खचली गेल्याचं चित्र आहे. त्यामुळे ह्या भागातील तीन ते चार हजार नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आहे.
महापालिकेकडून दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, विक्रोळीतील या परिसरात सध्या धोकादायक चित्र आहे. पण अद्याप कोणाचेही स्थलांतर झालेले नाही. त्यामुळे तीन ते चार हजार लोकवस्ती असणाऱ्या या भागात प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या भागत एकीकडे हिरानंदानी पार्क, मोठ्या इमारती, मोठे रस्ते आणि आयटी पार्क देखील आहे. हे सगळं डोंगराच्या पलिकडे आहे. तर डोंगराच्या अलिकडे झोपडपट्टी आणि कामगारांची घरं आहेत. 2021 मध्ये झालेल्या दरड दुर्घटनेच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. अशात सध्या दरडी कोसळत असताना प्रशासन ह्या नागरिकांचे स्थलांतर करणार का हे पाहणं गरजेचं आहे.