नवी दिल्ली : 'सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णायाचा अनादर होणार नाही', असं म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आजच्या सुनावणीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच कोर्टाच्या आदेशांचं पालन केलं जाईल असं देखील राहुल नार्वेकरांनी यावेळेस म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालायमध्ये आमदार अपात्रेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून होत असलेल्या दिरंगाईच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले. तर यानंतरच राहुल नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल नार्वेकरांनी काय म्हटलं?
'कोणतीही तडजोड न करता मला हा निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय मी घेईनच. सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशांचा अनादर कुठेही केला जाणार नाही. पण विधीमंडळाची आणि विधानभवनाचे सार्वभौमत्व राखणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे या गोष्टीचे भान ठेवून मला निर्णय घ्यायचा आहे. विधीमंडळाचे नियम आणि संविधानाच्या तरतुदी यांच्याशी कुठेही तडजोड न करता मला निर्णय घ्यावा लागेल', असं राहुल नार्वेकरांनी म्हटलं आहे. तर मी लवकरात लवकर निर्णय देण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील राहुल नार्वेकरांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना राहुल नार्वेकरांनी म्हटलं की, 'निवडणूक चिन्ह समोर घेऊन मी निर्णय देत नाही. मी तसं करत असेन तर ती चूक ठरेल त्यामुळे मी तसं काही करणार नाही, कोर्टाच्या आदेशांचं पालन करुनच मी काय तो आणि योग्य निर्णय घेईन.'
सर्वोच्च न्यायालायने काय म्हटलं ?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी किमान दोन महिन्यात निर्णय घेणं आवश्यक असल्याचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. तसेच, विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, असंही सरन्यायाधीश म्हणाले आहेत. पोरखेळ करताय का? असं म्हणत सरन्यायाधीशांनी अत्यंत कडक शब्दांत राहुल नार्वेकरांना सुनावलं आहे.
सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे न्यायाधीश सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनाही स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. तसेच, अपात्रता प्रकरणावरील सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठरवलेल्या वेळापत्रकावरही सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढले आहेत. कायदा तुम्हाला बसवून शिकवावा लागेल, असंही सरन्यायाधीश सुनावणीदरम्यान म्हणाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दोन महिन्यात या प्रकरणावर निर्णय घ्यावा लागेल. पण विधानसभा अध्यक्ष दोन महिन्यात हा निर्णय घेणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra Politics: पोरखेळ करताय का? सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना झाप झाप झापलं!