मुंबई : तुरुंगातील कैद्यांना दूरवर असलेल्या कुटुंबीयांशी संपर्क साधता यावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. कैद्यांना आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आप्तेष्टांशी बोलता येणार आहे.


मुंबईतील भायखळा जेलमध्ये मंजुळा शेट्येच्या झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. 'हिंदुस्तान टाइम्स' या वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

दोषी सिद्ध झालेल्या कैद्यांनाच व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबीयांशी बोलता येईल, म्हणजेच अंडर ट्रायल कैद्यांना ही सुविधा उपलब्ध नसेल, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक (तुरुंग प्रशासन) राजवर्धन सिन्हा यांनी दिली आहे.

मुंबईतील तुरुंगांमध्ये अनेक कैद्यांचा भरणा होतो. तुरुंगातील गर्दीमुळे काही कैद्यांना येरवडा, तळोजा किंवा औरंगाबादसारख्या लांबवरच्या जेलमध्ये हलवण्यात येतं. मात्र अंतरामुळे अशा कैद्यांच्या कुटुंबीयांना भेट घेण्यात अडचण येते. कैद्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना दूरवर प्रवास करुन रांगेत उभं राहावं लागतं. मात्र आता कुटुंबीयांची ही दगदग टळणार आहे.

महिन्यातून फक्त एकदाच दहा मिनिटांसाठी कुटुंबीयांना कैद्याशी बोलता येईल. यासाठी त्यांना जवळच्या जेलशी संपर्क साधावा लागेल. जेलमध्ये असलेल्या नातेवाईकाशी बोलण्यासाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर जिल्हा कोर्टाकडून मान्यता मिळेल. त्यानंतर कैद्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रुममध्ये नेण्यात येईल. यासाठी कुटुंबीयांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.

आर्थर रोड जेलची कैदी क्षमता 804 असून सध्या तिथे तीन हजारांहून जास्त कैदी आहेत. त्यापैकी फक्त सहा जण दोषी सिद्ध झाले आहेत.