Vedanta Semiconductor: महाराष्ट्रात जवळपास निश्चित झालेला वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanata-Foxconn) सेमीकंडक्टर (Semiconductor) प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राज्यात शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. राज्यात येणाऱ्या मोठ्या प्रकल्पांना सहकार्य करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आणि त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडाला. तब्बल एक लाख 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखभर नोकऱ्या उपलब्ध होऊ शकणारा सेमिकंडक्टर्सचा हा प्रकल्प अखेरच्या क्षणी गुजरातला मिळाला. त्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही चर्चा झाली.


महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील तळेगावमध्ये जागा निश्चित करण्यात आली होती. जुलै महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेदांताच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यानंतरही मंगळवारी वेदांता समूहाने गुजरातमध्ये सेमीकंडक्टरचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. 


नेमकी चर्चा काय?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर झालेल्या चर्चेचा नेमका तपशील समोर आला नाही. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांकडे राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीला, उद्योगांना सहकार्य करण्याची मागणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशीलही गुलदस्त्यात आहे.  


सेमीकंडक्टर बाबत आत्मनिर्भर होण्यासाठी भारतातील उद्योजकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या  तुटवड्यामुळे भारतातील उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना मोठा फटका बसला होता. सोमवारी वेदांता समूहाने तैवानमधील कंपनी फॉक्सकॉन कंपनीसोबत 20 अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. अहमदाबादजवळ हा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: