बीड : ऐकावं ते नवलच असा प्रकार आता बीड (Beed) जिल्ह्याच्या बाबतीत पुढे येत आहे. येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकारानंतर बीडमधील दहशत,गुंडगिरी आणि पोलीस व प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची मनमानी सातत्याने पुढे येत होती. तसेच, विविध ठेकेदारी, राख माफिया, टँकर माफिया, टिप्पर माफियांचेही कारनामे समोर आले होते. त्यानंतर, प्रशासनातील एका अधिकाऱ्याचा प्रताप समोर आला असून या महाशयांनी चक्क 39 लाख रुपयांचा अपहार वीजबिलात केल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी महावितरणने (Mahavitaran) दोघांवर निलंबनाची (Suspend) कारवाई करण्यात आली आहे. 

बीडच्या परळीमध्ये खासगी ग्राहकांच्या घरची बिले नगरपरिषदेच्या नावावर टाकून त्याद्वारे रक्कम जमा करत 39 लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मदेव चाटे यांनी महावितरणकडे केली होती. त्यानंतर, आता महावितरणने या तक्रारीची दखल घेत विभागातील रत्नदीप कटके व प्रशांत आंबडकर या दोन अभियंत्यांना निलंबित केले आहे.

आंबडकर आणि कटके यांच्या आयडीवरुन पोर्टलवर सदरील सर्व प्रकार करण्यात आल्याचे निलबंन पत्रात नमूद केलेले आहे. त्यानंतर महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली.तसेच आता या प्रकारात आणखी कोणी सहभागी आहे का? याची देखील चौकशी केली जात असून जे अधिकारी कर्मचारी या प्रकारात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत बीड येथील अधीक्षक अभियंता राजपूत यांनी दिले आहेत.

संतप्त पालकांची बीड बंदची हाक

बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आंदोलकांनी पोलीस तपास यंत्रणेला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. या प्रकरणातील दोन शिक्षक अद्याप फरार असून फरार शिक्षकांना अटक करण्याच्या मागणीसाठी पक्ष संघटना आणि पालकांनी क्लासेसच्या गेटला लावण्यात आलेल्या आरोपी शिक्षकांच्या फोटोला काळे फासून ठिय्या मांडला. दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणातील दोन फरार शिक्षकांना अटक न केल्यास सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना राजकीय पाठबळ असल्याने ते फरार होण्यास यशस्वी झाले. आरोपींना अटक करून क्लासेसच्या इमारतीला सील ठोकावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

हेही वाचा

संतापजनक घटनेवरुन बीड बंदची हाक, आंदोलक अन् पालक संतप्त; क्लासेसच्या गेटला फासले काळे