वसई - विरार :  विरारमध्ये  एका खासगी सांडपाणी प्रकल्पात साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या चार मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ऐन गुढीपाढव्याच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने विरारमध्ये (Virar News) शोककळा पसरली आहे. 


आज मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास विरारच्या ग्लोबल सिटी येथे रुस्तमजी शाळेच्या बाजूच्या एसटीपी प्लांटमध्ये खाजगी कंपनीचे तीन मजूर एसटीपी प्लांट चोकअप असल्याने उतरले होते. त्याचवेळी एक मजूर प्लांटमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी दोन मजूर उतरले ते वर न आल्याने एक खाजगी मजूर ही त्यात उतरला आणि दुर्दैवाने यात चारही मजूर गुदमरुन मरण पावले. 


चौथा मृतदेह तीन तासांनी बाहेर 


वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी तात्काळ तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढले. तर अमोल घाटाळ या मजुराचा मृतदेह तीन तासानंतर अग्निशमन कर्मचा-यांनी बाहेर काढला. शुभम पारकर (28), अमोल घाटाळ (27) निखिल घाटाळ (24) आणि सागर तेंडुलकर (29) अशी मृतांची नावे आहेत. ग्लोबल सिटी मधील 124 इमारतीचा हा एसटीपी प्लांट आहे. त्याची साफसफाईची जबाबदारी पॉलिकॉन या कंपनीला दिली होती. आज वसई विरार पालिकेच आयुक्त अनिलकुमार पवार यांनी घटनास्थळी  पाहणी केली. 


सफाई कामगारांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्षच


या अगोदर देखील गुदमरुन मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.  तरीही प्रशासन कामगारांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. कामगारांकडून सफाई काम करुन घेतानाचे  सुरक्षेचे सर्वच नियम धाब्यावर बसवले जात आहेत, असाही आरोप प्रशासनावर होत आहे. यावर न्यायालयानेही अनेकदा सरकारला फटकारले आहे. मात्र, सरकार आणि प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही, असेच दिसत आहे.


 कडक कारवाईची मागणी


सेप्टिक टँक, मॅनहोल यामध्ये जीव धोक्यात घालून कामगारांना काम करावे लागते. यापूर्वीही कामगारांचा सेप्टिक टँक, मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्यामधून महापालिका व इतर खासगी यंत्रणेने यावर कोणतेही ठोस पाऊस उचलले नाही. मुळात  सेप्टिक टँकमध्ये कामगारांना उतरविणे चुकीचे आहे. त्यामुळे या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्याविरोधात  कडक कारवाई करण्यात यावी. त्यामुळे यापुढे अशा दुर्घटना घडणार नाहीत याची दक्षता महापालिकेने घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


हे ही वाचा :


Pune Crime News : मित्राच्या मदतीने 18 वर्षीय लेकीनंच आईची हत्या केली; घसरुन पडल्याचा बनाव रचला; पोलीस तपासात मात्र बिंग फुटलं, कारण ठरलं...