Uddhav Thackeray :  नरेंद्र मोदी मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणारच असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. महाविकास आघाडीतील जागा वाटप जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आपण पंतप्रधान म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका करणार असल्याचे स्पष्ट केले. 


आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद (Joint Press Conference Of Maha Vikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष कार्यालय 'शिवालय' येथे पार पडली. यामध्ये जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदींसह इतर घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. 


उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, महाविकास आघाडी व्यापक होईल यासाठी प्रयत्न आम्ही केले. प्रकाश आंबेडकर यांना काही जागा देऊ केल्या होत्या. आता ते काही जरी बोलले तरी आम्ही काही बोलणार नाही. आम्हाला अजूनही त्यांच्याबद्दल आदर असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपवर निशाणा साधताना उद्धव यांनी म्हटले की, काल (सोमवार, 8 एप्रिल रोजी) तीन गोष्टीचा एकत्रित योग होता.  अमावस्या होती, ग्रहण होत आणि यांची सभा होती.  काल जे भाषण झालं ते पंतप्रधान यांचे भाषण नव्हते. ते भेकडं जनता पक्षाचे नेते मोदी यांचे भाषण होते.  भाजपमध्ये ताकद नाही म्हणून भेकडं म्हणत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 


मोदींनी स्वत: जवळ चायनीझ माल ठेवावा...


'भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा' असा भाजप पक्ष झाला असल्याची बोचरी टीका उद्धव यांनी केली. जेव्हा शिवसेना निर्माण झाली,तेव्हा ते मोदी हिमालयात असतील. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना खरी शिवसेना माहित आहे. त्यांनी त्यांच्याजवळ चायनीझ माल ठेवावा असा चिमटाही ठाकरे यांनी काढला.  भाजप पक्ष खंडणीखोर झाला असून चंदा दो धंदा लो असे यांचे काम आहे.  खंडणीखोर नेत्यांनी असे शिवसेनेला हिणवणे योग्य नसल्याचे ठाकरे यांनी म्हटले. 


महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय?


लोकसभा निवडणूक 2024 साठी (Lok Sabha Election 2024)  अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. शिवसेना ठाकरे गट 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे.सांगली आणि भिवंडीच्या जागांचाही तिढा सुटला असून सांगली ठाकरे गट आणि भिवंडी राष्ट्रवादी शरद पवार गट लढवणार आहे.