Urban Naxal Case Updates:  एल्गार परिषद आणि शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी आणि ज्येष्ठ तेलुगु कवी वरवरा राव (82) यांनी मोतींबिदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला जाण्यासाठी हायकोर्टाकडे परवानगी मागितली आहे. ही परवानगी नाकारणाऱ्या मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाच्या आदेशाला राव यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्याची दखल घेत हायकोर्टानं एनआयएला नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहे.


राव यांना साल 2018 मध्ये अटक करण्यात आल्यानंतर मार्च 2021 पर्यंत ते न्यायालयीन कोठडीत होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने साल 2022 मध्ये त्यांना वैद्यकीय कारणास्तव अटीशर्तीसह जामीन मंजूर केला होता. या आदेशातील अटीनुसार राव यांना मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाचं अधिकारक्षेत्र सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये राव यांनी मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात मोतीबिदूच्या शस्त्रक्रियेसाठी तीन महिने हैदराबादमध्ये राहण्याची परवानगी मागणार अर्ज  दाखल केला होता. मात्र न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्या निर्णयाला राव यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायमूर्ती आर. जी अवचट यांच्यासमोर गुरूवारी सुनावणी झाली.


मुंबईत ही शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार महागडे आहेत. आपण तेलंगना येथील निवृत्तीवेतन धारक जेष्ठ नागरिक असल्यानं तिथं माफक दरात वैद्यकीय सेवेस पात्र आहेत, असा दावा राव यांनी या याचिकेतून केला आहे. तसेच मुंबईतील सरकारी रुग्णालयांची स्थिती अत्यंत बिकट असून आपल्याला तात्पुरता जामीन देताना हीच बाब विचारात घेण्यात आली असल्याचंही राव यांनी या याचिकेत नमूद केलेलं आहे. याशिवाय 6 मार्च 2021 पासून आपण जामीनातील कोणत्याही अटीशर्तींचं उल्लंघन केलेलं नसल्याचंही त्यांनी याचिकेत अधोरेखित केलं आहे. 


31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवार वाड्याजवळ एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी, 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळला होता. एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणांमुळे हा हिंसाचार उसळल्याचा तसेच एल्गार परिषदेला माओवाद्यांकडून अर्थपुरवठा झाला आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते व विचारवंतांचा माओवाद्यांशी थेट संबंध आहे, असा पोलिसांचा आरोप आहे. पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेचा भीमा कोरोगाव प्रकरणी संबंध जोडत पोलिसांनी वरवरा राव यांना साल 2018 मध्ये अटक केली होती. 


ही बातमी देखील वाचा