Deven Bharti: मुंबई पोलीस दलाचे (Mumbai Police) पहिले विशेष पोलीस आयुक्त (Special Commissioner) देवेन भारती (Deven Bharti) यांनी आज आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी केलेल्या ट्वीटची चर्चा रंगली आहे. देवेन भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती केली असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष पोलीस आयुक्तपदामुळे मुंबई पोलीस दलात दोन सत्ताकेंद्र असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आज देवेन भारती यांनी केलेल्या ट्वीटचीही चर्चा रंगली आहे. 


मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी म्हटले की, मुंबई पोलीस ही एक टीम आहे, इथे कोणताही सिंघम नाही, असे ट्वीट त्यांनी केले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी मुंबई पोलीस दलात कोणताही मतभेद नसल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे.  






मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त केलेले आयपीएस देवेन भारती आज पदभार स्वीकारण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले. त्यापूर्वी कायदा व सुवव्यस्था विभागाचे जॉईंट सीपी सत्यनारायण चौधरी आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या अंतर्गत काम करतील. देवेन भारती यांच्या अखत्यारीत आर्थिक गुन्हे आणि इतर काही विभागांचा कार्यभार येण्याची शक्यता आहे. 






मविआच्या काळात साईडपोस्ट, फडणवीसांचे निकटवर्तीय


देवेन भारती हे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेन भारती यांना साईड पोस्टिंग देण्यात आली असल्याचे म्हटले जाऊ लागले. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांंच्यावर पोलीस सहआयुक्त म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर भारतींना अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बढती देऊन दहशतवादविरोधी पथकात पाठवण्यात आले. 


मविआच्या काळात भारतींना साईड पोस्टिंग देण्यात आली. त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आलं होतं. डिसेंबर महिन्यात त्यांच्यावर सहपोलीस आयुक्त वाहतूक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.


देवेन भारती आहेत कोण?


वरिष्ठ आयपीएस अधिकारी आयपीएस अधिकारी देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस दलात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. अतिरिक्त पोलीस आयुक्त, गु्न्हे शाखा, सहपोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आदी जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. राज्यातून इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.