Indian Science Congress Nagpur : प्रत्येकाच्या शेतात देशी बियाणे वापरले गेले पाहिजे, गावात विषमुक्त भाजीपाला विकला गेला पाहिजे, तरच पुढची युवापिढी सशक्त होईल. रासायनिक खते, औषधांच्या वापरामुळे रानभाज्य नष्ट झाल्या. भविष्यात माती देखील नष्ट होईल, असा इशारा देशात बीज माता म्हणून देशभर ओळख असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांनी दिला. पुढे बोलताना राहीबाई पोपेरे म्हणाल्या, 'सुरवातीच्या काळात माझ्या कामावर टिका व्हायची, लोक हसायचे. आज 3 हजार 500 महिलांना सोबत घेऊन 200 गावांमध्ये काम सुरु आहे. आपण पैसे देऊन विष खरेदी करतो आणि खातो. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यासाठी देशी बियाण्यांचा वापर व त्यापासून मिळणारे उत्पादन वाढले पाहिजे. विविध पिकांच्या देशी बियाण्यांच्या संवर्धनासह त्याचा प्रचार प्रसार आम्ही करतो आहे.'
शेतकरी विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित बीजमाता म्हणून देशभर ओळख असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा इंडियन सायन्स कॉंग्रेसच्यावतीने अध्यक्षा डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी सत्कार केला.
देश धान्य उत्पादनात खुप पुढे गेला आहे. यामागे शेतकऱ्यांची फार मोठी मेहनत आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार सुधारली नसल्याचे दिसून येते. शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्वाचा आहे. शेतकऱ्यांनी बाजारतंत्रही अवगत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या कोलकाता येथील केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ. बसंत कुमार दास यांनी केले.
रातुम नागपूर विद्यापीठात आयोजित इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या निमित्त शेतकरी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. दास बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना होत्या. पद्मश्री राहीबाई पोपेरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाचे (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur) कुलगुरु डॉ.सुभाष चौधरी, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.आशिष पातुरकर, भारतीय विज्ञान काँग्रेसचे सचिव डॉ. एस. रामकृष्णन, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रकाश कडू, शेतकरी विज्ञान काँग्रेसचे संयोजक डॉ.प्रकाश ईटनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अन्नधान्याच्या उत्पादनात आपण फार मोठी प्रगती केली आहे.उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहे. फॅमिली फार्मिंग ही नवीन संकल्पना आपण आणतो आहे. जैविक खाद्य पदार्थांना आपण पुढे नेतो आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने शेतकऱ्यांना सक्षम केले जात आहे, असे डॉ.दास म्हणाले. कुलगुरु डॉ. पातुरकर म्हणाले, शेतीची व शेतीशी निगडीत व्यवसायाची सांगड घालणे महत्वाचे आहे. पशु व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, दुग्धोत्पादन आणि नैसर्गिक शेती झाली पाहिजे. या शेतीचा एकूण शेत उत्पादनातील वाटा 40 ते 45 टक्के पर्यंत गेला पाहिजे.
डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना म्हणाल्या, आजही शेतकऱ्यांची स्थिती नाजूक आहे. मेहनती इतके उत्पन्न मिळत नाही. निसर्गातील बदलाचा देखील फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, यासाठी यंदा पहिल्यांदाच शेतकरी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. देश, विदेशातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंथन करतील आणि त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल. अन्नधान्याच्या समृद्धतेसह आज आपण एकापेक्षा अधिक पिके घेऊ शकतो आहे. पुढील काळ शेती व शेतकऱ्यांसाठी निश्चितच समृध्दीचा काळ असेल.
विदर्भातील 11 हजारांवर गावापर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान
कुलगुरु डॉ.सुभाष चौधरी म्हणाले, जे विज्ञान अस्तित्वात आहे, तेच आपण शिकतो आहे. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची आहे. शेतकऱ्यांनी जोड व्यवसायासह आपल्या कौशल्याचा देखील वापर करावा. डॉ.प्रकाश कडू यांनी अकोला येथील कृषी विद्यापिठाच्या कामाची माहिती दिली. विद्यापिठाने आतापर्यंत 176 विविध पिकांचे वाण विकसित केले आहे. विदर्भातील 11 हजारावर गावांपर्यत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यात आले आहे. जैविक शेतीसाठी विद्यापीठ नियमित काम करीत असल्याचे डॉ.कडू यांनी सांगितले.
ही बातमी देखील वाचा...
आनंदीबाई जोशी ते कांदबिनी गांगुली; महिला शास्त्रज्ञांच्या माहितीचे विज्ञानयात्रींना अप्रूप
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI