मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली आहे. या अर्जावर मंगळवारी न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी होणार आहे.


सर्वोच्च न्यायालयानं 11 फेब्रुवारीपर्यंत तेलतुंबडे यांना अटकेपासून दिलासा दिलेला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून त्यांना नुकतीच झालेली अटक बेकायदेशीर असल्याचं ठरवत कोर्टानं त्यांची मुक्तता केली आहे. पोलिसांच्या वतीनं तेलतुंबडे यांना करण्यात आलेली अटक ही कायदेशीर प्रक्रियेनुसार असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं होतं. तसेच मुंबई उच्च न्यायालयानं याआधीही तेलतुंबडे यांचा जामीन फेटाळला आहे, असाही पुणे पोलिसांचा दावा होता.


मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्राध्यापक तेलतुंबडे यांच्याकडे अटकपूर्व जामीन घेण्यासाठी 11 फेब्रुवारीपर्यंतचा अवधी आहे. या कालावधीत ते दाद मागू शकतात, असा आदेश सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी दिला आहे. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांची कृती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन करणारी आणि अवमान करणारी आहे, असं निरीक्षण नोंदवत याची माहिती सर्वोच्च न्यायालयालाही दिली जावी, असंही त्यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.


शहरी नक्षलवाद प्रकरणी पुणे पोलिसांनी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्यासह अन्य 21 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सुरु असून यातील अनेकांना अटकही करण्यात आली आहे.