मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मोठा फटका बसला आहे. निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या चार जिल्हाध्यक्षांनी आपले राजीनामे दिले आहेत.
मुंबईतील सहापैकी चार जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुनिल पालवे, ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र थोरात, उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष अरुण मिश्रा, दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष रंगनाथन अय्यर यांचा समावेश आहे.
मुंबईतील अंतर्गत राजकराणामुळे राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. राजीनामा दिलेले चारही जिल्हाध्यक्ष लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. चारही जिल्हाध्यक्षांना बोलवून शरद पवार समजूत काढणार असल्याचंही बोललं जात आहे.
राष्ट्रवादी मुंबई युवक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली काम करु शकत नाही आणि या हिटलरशाही कार्यपद्धतीला कंटाळून आम्ही आमच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचा चौघांनी म्हटलं आहे. मात्र आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहून सदैव पक्षासाठी कार्यरत राहू असं आश्वासन चारही जिल्हाध्यक्षांनी दिलं आहे.