मुंबई : 18 वर्षांवरील अविवाहित तरुणीच्या पालकांचा घटस्फोट झाला असेल, तरी ती आपल्या वडिलांकडे देखभाल खर्च मागू शकते, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला.


इतकंच नाही, घटस्फोटित महिला आपल्या सज्ञान अविवाहित कन्येच्या वतीने आपल्या विभक्त पतीकडे देखभाल खर्च मागू शकते, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. जस्टिस भारती डांगरे यांनी शुक्रवारी हा निर्वाळा दिला.

आपल्या घटस्फोटित पतीकडून 19 वर्षांच्या मुलीसाठी देखभाल खर्च मिळावा, यासाठी मुंबईतील एका महिलेने कुटुंब न्यायालयात अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळल्याने तिने या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

संबंधित दाम्पत्य 1988 मध्ये विवाहबंधनात अडकलं होतं, मात्र अवघ्या 9 वर्षांतच म्हणजे 1997 मध्ये ते विभक्त झाले. दाम्पत्याच्या तिन्ही अपत्यांचा (दोन मुलगे आणि एक मुलगी) ताबा आईकडे आहे. मुलं अल्पवयीन असेपर्यंत वडिलांनी दरमहा प्रत्येक मुलाचा देखभाल खर्च आईला दिला होता. मात्र मुलगी 18 वर्षांची झाल्यावर वडिलांनी तिला देखभाल खर्च देण्यास नकार दिला.

मुलगी 18 वर्षांची झाली असली तरी उच्चशिक्षण घेत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसल्याचं महिलेने याचिकेत म्हटलं होतं. एक मुलगा शैक्षणिक कर्ज फेडत असल्यामुळे, तर दुसऱ्याला अद्याप नोकरी न मिळाल्यामुळे त्यांचा आर्थिक हातभार नसल्याचंही महिलेने सांगितलं होतं.

संबंधित महिलेला पतीकडून दरमहा 25 हजार रुपये देखभाल खर्च मिळतो. मुलीसाठी तिने अतिरिक्त 15 हजार रुपयांची मागणी केली होती.

18 वर्षांवरील अविवाहित मुलीला शारीरिक किंवा मानसिक आजार नसला, तरी ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसल्यास वडिलांकडे देखभाल खर्च मागू शकते, असं जस्टिस डांगरे यांनी स्पष्ट केलं.