मुंबई : मुंबईत आज रेल्वेच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत.

मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते कर्जत दरम्यान ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील पादचारी पुलाचा गर्डर बदलणे, आणि पुलाच्या दुरुस्तीकामासाठी कल्याण ते कर्जत दरम्यान अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 9.15 ते दुपारी 1.53 या काळात हे काम होणार आहे. त्यामुळे कल्याणहून कर्जत, खोपोली, बदलापूर, अंबरनाथकडे जाणाऱ्या सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम मार्गावर जम्बो मेगाब्लॉक

तर पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान सांताक्रुझ व माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात सांताक्रुझ आणि माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरून चालवल्या जातील.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी ब्लॉक

दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत कुर्ला-वाशी दरम्यान अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 10.34 ते दुपारी 3.39 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वाशी/ बेलापूर/ पनवेलसाठी कोणतीही लोकल सुटणार नाही. तसेच सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 वाजेपर्यंत पनवेल/ बेलापूर/ वाशीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी कोणत्याही लोकल सुटणार नाहीत.

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल विशेष लोकल सेवा चालविण्यात येईल.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल

मध्य रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकमुळे  लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा एक्स्प्रेस (17222), मुंबई-तिरूनेलवेली नागरकोईल एक्स्प्रेस (16339) आणि  मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस (17031) आदी गाड्या कर्जत ते पनवेल मार्गावरून धावतील. त्यामुळे या गाड्या लोणावळा स्थानकावर 25 ते 30 मिनिटे उशिराने पोहोचतील.

तर अप मार्गावरील हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस(17032), चेन्नई एक्स्प्रेस (11042) आणि कोइम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (11014) गाड्या कर्जत-पनवेल मार्गाने प्रवास करतील. त्यामुळे कल्याण स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांना दिवा स्टेशनवर उतरावे लागेल. या गाड्या अंतिम स्थानकांवर निर्धारित वेळेपेक्षा 30 मिनिटे उशिराने पोहोचतील.