मुंबई : कोरोना उपचारासाठी उपयुक्त असलेल्या प्लाझ्मा थेरपीत फसवणूक होत असल्याची माहिती राज्याच्या गृह विभागाकडून समोर आली आहे. यासंदर्भात गरजू रुग्णांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यामार्फत करण्यात आले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे झालेले बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार गरजू लोकांना प्लाझ्मा दान देताना आढळून आल्याचे गृह विभागाच्या निदर्शनास आले आहे. याविरोधात गृह विभागाने सायबर सेलच्या माध्यमातून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.


कशी होऊ शकते प्लाझ्मा थेरपीत फसवणूक?
देणगीदाराच्या कमतरतेमुळे प्लाझ्मा थेरपी महागडी होत आहे. राज्यात काही निवडक रुग्णालयात ही उपचार पद्धती करण्यात येत आहे. मात्र गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी वरदान ठरत असल्याने अनेक जण प्लाझ्मा देणगीदार मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, कोरोनातून बरे झालेले काही बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार थेट लोकांना प्लाझ्मा दान देताना आढळून आल्याचा गृह खुलासा विभागाने केला आहे.


प्लाझ्मा दान करण्यासाठी कोविडमधून बरे झाल्याचा वैद्यकीय अहवाल आणि प्लाझ्मा दान करण्यास तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. गरजू लोकांच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेत त्यांना फसवण्याच्या उद्देशाने बनावट प्रमाणपत्र देखील तयार केली जात आहेत. ही खोटी प्रमाणपत्रे दाखवून लाखो रुपये गरजू रुग्णांना कडून घेतले जाऊ शकतात. तसेच सायबर गुन्हेगार यासाठी समाज माध्यमांवर विविध आमिषांचा वापर करत आहेत. डार्क वेब आणि बेकायदेशीर वाहिन्यांवर प्लाझ्माच्या विक्री संदर्भात फसवणुकीची शक्यता असल्याने यापासून सावधान राहण्याचे आणि सर्व संबंधित लोकांनी या प्लाझ्मा थेरपी उपचाराबाबत जागरुक राहावे. तसेच प्लाझ्मा दाता ऑनलाईन शोधताना काळजी घ्यावी आणि नागरिकांनी कोणत्याही कोविड उपचाराच्या सुरक्षित पद्धतींवरच अवलंबून असले पाहिजे, असे आवाहन गृह मंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.


तसेच अशा पद्धतीने लोकांची फसवणूक करुन कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्याऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही गृहमंत्र्यांनी दिले आहेत. जर या संदर्भात काही फसवणूक होत असेल तर आपल्या नजीकच्या पोलिस स्टेशनला कळवावे किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी अशा सूचना देशमुख यांनी केल्या आहेत.


राज्यात कुठे कराल सुरक्षित प्लाझ्मा थेरपी?
सध्या कोरोनाशी लढा देत असलेल्या गंभीर आणि अति गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन आठवड्यांपूर्वीच 'प्रोजेक्ट प्लॅटिना' या नावाने जगातील सगळ्यात मोठ्या प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलचा शुभारंभ केला. या प्रकल्पात राज्यातील 17 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये आणि मुंबईतील बीएमसीचे चार वैद्यकीय महाविद्यालये अशा एकूण 21 केंद्रांवर प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. तसेच प्लाझ्मा थेरपीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी सरकरने www.plasmayoddha.in हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करुन दिले आहे.