मुंबई : आगामी गणेशोत्सवाला महाराष्ट्रात साधेपणाने साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशाच पद्धतीने 1 ऑगस्ट रोजीच्या 'बकरी ईद'च्या सणालाही साधेपणाने साजरा करण्यास परवानगी द्या. यासोबतच या सणाला महत्त्वपूर्ण असणारी बाब म्हणजे कुर्बानी देणे. यालाही शासनाने सूट द्यावी अशी मागणी कॉंग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून कॉंग्रेसच्या काही नेत्यांकडून बकरी ईद साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीला समर्थन देत नसीम खान यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बकरी ईदचा सण साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. यासोबतच महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे देखील हीच मागणी केली आहे.
याबाबत बोलताना नसीम खान म्हणाले की, "राज्यात वेगवेगळे सण साजरा करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. मग बकरी ईदला का नाही? गणेशोत्सवाला जसे विविध निर्बंध लावून साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्याच पद्धतीने बकरी ईद सणालाही द्या. 1 ऑगस्ट रोजी मुस्लीम समाजाचा अतिशय महत्त्वाचा सण असलेल्या 'ईद ऊल अदाह'च्या दिवशी कुर्बानी देण्याची सूट आणि तशी व्यवस्था सरकारने करुन द्यावी. याबाब सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. "
बकरी ईद या सणाला मुस्लीम समाजात खूप महत्त्व असतं. यादिवशी कुर्बानी देणं अनिवार्य असतं. दरवर्षी मोठ्या हर्षोल्हासात संपूर्ण जगात हा सण मुस्लीम बांधव साजरा करतात. परंतु यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केल्याने अनेक सण आणि धार्मिक उत्सव साजरे करता आले नाहीत. असं असतानाही कोविड काळात काही शर्तींच्या आधारावर गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु बकरी ईद ह्या मुस्लीम समाजाच्या महत्त्वाच्या सणाविषयी आतापर्यंत सरकारकडून कोणताही निर्णय झाला नसल्याने मुंबईसह संपूर्ण राज्यातील मुस्लीम समाज आणि मुस्लीम संघटनामध्ये खूप अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सध्या कोविड काळ असूनही जसा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, त्याच धर्तीवर मुस्लीम समाजासाठी महत्त्वाच्या असलेल्या ईद ऊल अदाह सणादिवशी कुर्बानी करण्याची सूट आणि व्यवस्था करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, जेणेकरुन राज्यातील तमाम मुस्लीम बांधव आनंदाने हा सण साजरा करतील, अशी मागणी होत आहे.