मुंबई : विश्व हिंदू परिषदेच्या रुग्ण सेवा सदनाचा आज वर्धापनदिन होता. या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजे उपस्थित होते. त्यांनी यावेळी शिवसेनेच्या आगामी आयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे.


कोकजे म्हणाले की, ''25 नोव्हेंबर रोजी शिवसेना अयोध्येत रॅली काढून शक्तीप्रदर्शन करणार आहे. परंतु रामजन्मभूमीचा मुद्दा इतक्या वर्षांनी अचानक कसा काय आठवला हा प्रश्न मला पडला आहे. अयोध्येमध्ये शिवसेनेची किती ताकद आहे? मुंबईत परप्रांतीयांना झोडायचे आणि तिकडे (उत्तर भारतात) अयोध्येत जाऊन परप्रांतियांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे काय उत्तरे देणार आहेत.''

विहिंपचा टोला
शिवसेना राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करायचा प्रयत्न करत आहे. परंतु असा मुद्दा हायजॅक करण्याची ताकद सेनेकडे नाही. पत्रकार परिषदा घेऊन राम मंदिर बनत नाही. शिवसेनेने आधी बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक बांधावे त्यानंतरच अयोध्येकडे लक्ष द्यायला हवे.

राम मंदिराबाबत कोकजे म्हणाले की, केंद्र सरकारने राम मंदीराबाबत अध्यादेश काढायला हवा. न्यायालयाच्या निकालांची आणि प्रक्रियांची किती दिवस वाट पहाणार? सरकारने राम मंदीराबाबत कायदा करायला हवा.

कोकजे यांनी शबरीमला मंदिराबाबतही वक्तव्य केले आहे. कोकजे म्हणाले की, शबरीमालामध्ये ज्या महिला पत्रकार आणि अँक्टीव्हीस्ट म्हणून जात होत्या त्यांना शबरीमला मंदिर कुठे आहे, हेदेखील माहीत नव्हते.