मुंबई : 'चला हवा येऊ द्या'च्या 5 आणि 6 नोव्हेंबर 2018 च्या कार्यक्रमातील 'दिवाळी पहाट' कार्यक्रमातील आगरी कवी मिथुन भोईर उर्फ 'अधोक्षज' भोईरचे विनोदी पात्र दाखवले होते. या आगरी पात्रामुळे आपल्या समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने केला होता. याबाबत अभिनेते भाऊ कदम यांना जाहीर माफी मागतली आहे.


'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात जे आगरी, कोळी पात्र दाखवलं, ते आमच्याकडून चुकून झालं. ते पात्र आक्षेपार्ह असून आम्ही तो भाग सगळीकडून डिलीट केला आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही आगरी, कोळी बांधवांची जाहीर माफी मागतो. यापुढे आमच्याकडून कोणत्याही समाजाचा अपमान होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ", अशा शब्दांत भाऊ कदम यांनी माफी मागितली. भाऊ कदम यांचा माफीनामा सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे.


काय आहे प्रकरण?


'चला हवा येऊ द्या'च्या 5 आणि 6 नोव्हेंबर 2018 च्या कार्यक्रमातील 'दिवाळी पहाट'मध्ये विविध कवी, गायक अशी पात्रं दाखवली होती. त्यात आगरी कवी मिथुन भोईर उर्फ 'अधोक्षज' भोईरचे विनोदी पात्र दाखवले होते. मात्र आगरी समाजात हे नाव अत्यंत अभावाने आढळत असल्याचं पत्रात अॅड. भारद्वाज लक्ष्मण चौधरी यांनी म्हटलं.


या पात्रामुळे आपल्या समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने केला आहे. आगरी-कोळी समाजाची कार्यक्रमातून जाहीर माफी मागण्याचीही मागणी या संघटनेने केली होती.


आगरी पात्राद्वारे विनोद निर्मिती करणे गैर नाही. त्यासाठी आगरी बोलीभाषिक वैशिष्ट्याचा वापर करणेही चूक नाही. पण आगरी पात्राद्वारे आगरी समाजावर चुकीची टीका टिप्पणी करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असं आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने बजावलं होतं.


संबंधित बातम्या


'चला हवा येऊ द्या'तील 'त्या' पात्रामुळे आगरी बांधव दुखावले