कल्याण : सोने व्यापाऱ्याने गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार डोंबिवलीत समोर आला आहे. अजित कोठारी असं या व्यापाऱ्याचं नाव असून तो दुबईत पळून गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Continues below advertisement


विजय मल्ल्या, निरव मोदी यांच्यासारखाच हा प्रकार डोंबिवलीत घडला आहे. अजित कोठारी असं या सोनं व्यापाऱ्यांच नाव आहे. डोंबिवली शहरातील नामांकित सोनं व्यापारी असलेला कोठारी गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशात पसार झाला आहे आणि यामुळेच डोंबिवलीकर पुरते हवालदिल झाले आहेत.


डोंबिवलीच्या मानपाडा रोडवर प्रथमेश ज्वेलर्स नावाने दुकान चालवणाऱ्या कोठारी याने ग्राहकांना अनेक ऑफर्स देत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक स्वीकारली होती. रोख रकमेच्या बदल्यात व्याज, तर 10 तोळे सोन्याच्या मोबदल्यात वर्षाला दोन तोळे सोनं निव्वळ व्याज म्हणून देण्याची स्वप्नं त्यानं लोकांना दाखवली. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी त्याच्याकडे आयुष्यभराची पुंजी गुंतवली.


मात्र अचानक कोठारी हा दुकान बंद करून पळून गेला आणि ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी या सगळ्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.


हिशोबी पैसे आणि दागिने होते, अशा 24 जणांनी आत्तापर्यंत पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत. मात्र बेहिशोबी पैसे आणि दागिने गुंतवणाऱ्यांची संख्याही मोठी असून अनेकांनी कोठारीकडे किलो किलो सोनं ठेवल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर कोठारीला शोधून काढण्याची मागणी खुद्द राज्यमंत्री आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.


ग्राहकांच्या पैशातून कोठारी याने डोंबिवलीसह अंबरनाथ, बदलापूर, वांगणी आणि थेट दुबईतही मालमत्ता विकत घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फसवून पळालेल्या कोठारीला लवकरात लवकर शोधून काढावं, अशी मागणी गुंतवणूकदारांमधून केली जात आहे.