Mumbai Crime News: बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना... ही म्हण प्रचलित आहे. आपण अगदी सर्रास या म्हणीचा वापर होताना पाहतो. काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणात ही म्हण लागू होते. जोगेश्वरीत (Jogeshwari News) घडलेल्या एका घटनेत काही मित्रांना फुकट जेवण्याचा मोह आवरला नाही आणि पुढे जे झालं ते खरंच डोक्याला हात लावायला भाग पाडणारंच आहे. 


कधी कधी मोह भलताच महाग पडतो. असाच काहीसा प्रकार गोरेगाव येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणाच्या बाबतीतही घडला आहे. जोगेश्वरी परिसरात एका अनोळखी लग्न समारंभात फुकट जेवण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय तरुण आणि त्याच्या मित्रांसोबत धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे. शिवाय या तरुणाची स्कूटर देखील गायब झाल्याची तक्रार त्यानं ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. स्कूटर आणून देण्याचं वचन दिलं, मात्र ज्यानं वचन दिलं, तो देखील त्या ठिकाणावरून गायब झाल्याचं तरुणानं तक्रारीत म्हटलं आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, 13 जून रोजी रात्री 12 वाजता गोरेगाव येथे राहणारा जावेद कुरेशी हा 24 वर्षीय तरुण, त्याचा सतरा वर्षीय चुलत भाऊ आणि काही मित्रं असे एकत्र फिरण्यासाठी जोगेश्वरी परिसरात गेले. साडेबारा वाजताच्या आसपास ते जोगेश्वरी परिसरात पोहोचले. त्यावेळी तिथल्या एका कम्युनिटी हॉलमध्ये लग्नाच्या रिसेप्शनची पार्टी सुरू असल्याचं त्यांनी पाहिलं. तरुणांना मोह आवरला नाही आणि फुटक, भरपेट जेवणाचा आनंद घेण्यासाठी सर्वच्या सर्व कम्युनिटी हॉलमध्ये घुसले. 


कुरेशी त्याचा चुलत भाऊ आणि त्यांचे मित्र आत शिरताच जेवण सुरू असलेल्या काऊंटरकडे प्लेट घेण्यासाठी उभे राहिले. या चौघांपैकी एकालाही वधू किंवा वर पक्षाकडील कोणीही ओळखत नव्हते. मात्र आपण वऱ्हाडींपैकी आहोत, अशा अविर्भावात ते चौघेजण फिरत असतानाच वधु कुटुंबीयांपैकी काही लोक त्यांच्याशी बोलू लागले, हे चारही तरुण आमंत्रण नसतानाही आत घुसले असल्याचं काही वेळातच वधू पक्षाच्या लोकांच्या लक्षात आलं. म्हणून वधू पक्षाकडील मंडळी आक्रमक झाली. त्यांनी त्या तरुणांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केल्यामुळे ते चारही तरुण कम्युनिटी हॉलमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू लागले. या धक्काबुक्कीत वधू पक्षाकडे मंडळींनी त्यांना बाहेर रस्त्यावर काढले आणि पुन्हा कम्युनिटी हॉलमध्ये गेले.


दरम्यान, त्या तरुणाची स्कूटर आत मध्येच राहिल्यानं त्यानं एका तरुणाकडे आपली स्कूटर बाहेर आणून देण्याची विनंती केली. त्यानं आश्वासनही दिलं की, मी स्कूटर बाहेर आणून देतो. कुरेशिनं स्कूटरची चावी त्या तरुणाकडे दिली आणि स्कूटर बाहेर घेऊन येण्याची तो वाट पाहू लागला. मात्र बराच वेळ गेला तरी देखील तो तरुण स्कूटर बाहेर घेऊन आलाच नाही. शेवटी शनिवारी कुरेशी यानं ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात आपली तक्रार दाखल केली.