मुंबई : मुंबई महानगरीय प्रदेश म्हणजेच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील दुचाकींचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. सरकारी आकडेवारीनुसार मुंबई मेट्रोपोलिटनमधील टू व्हीलर्सची संख्या लवकरच 40 लाखांचा टप्पा ओलांडणार आहे.
चीनला मागे टाकून भारत दुचाकींची सर्वात मोठी बाजारपेठ ठरणार आहे. एका वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्याच्या माहितीनुसार आजच्या घडीला मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील एकूण बाईक आणि स्कूटरची संख्या 39.2 लाख इतकी झाली आहे. येत्या काही आठवड्यात 40 लाखांचा टप्पा गाठला जाईल.
एका महिन्यात एकट्या मुंबईतच दुचाकींनी दहा लाखांचा टप्पा ओलांडला. 6.4 लाख स्कूटर आणि 34 हजार मोपेड्सचा समावेश आहे.
दुचाकी घेण्यामागील कारणं?
1. जवळच्या अंतरावर (भाजीपाला किंवा बाजारहाट) जाणे
2. मुलांना शाळा किंवा क्लासेसला सोडणे
3. घर ते रेल्वे स्टेशनपर्यंतचा प्रवास
4. चारचाकींमुळे झालेल्या वाहतूक कोंडीतून जलद मार्ग काढणे
5. रिक्षा-टॅक्सीच्या तुलनेत स्वस्त, आरामदायी आणि वेगवान प्रवास
6. बस, ट्रेनसारख्या सार्वजनिक वाहनांवर अवलंबून रहावं न लागणे
7. बाईकचे कमी दर, कमी ईएमआय
वाहतूक विषयातील जाणकारांच्या मते, दुचाकी ही शहरी भागात इतरांसाठी त्रासदायक आहे. सीएनजीचा पर्याय नसल्याने वायू त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण, दुचाकीस्वारांची सुरक्षा धोक्यात असणं, ट्रिपल सीट, बाईक चालवताना फोनवर बोलणं, हेल्मेट न घालणं किंवा लेन कटिंग यासारख्या वाहतूक नियमांचं सर्रास होणारं उल्लंघन यामुळे टू व्हीलर्स ही डोकेदुखी असल्याचं मत काही जण व्यक्त करतात.
पुणे, दिल्ली, चेन्नई, बंगळुरु या शहरांच्या तुलनेत मुंबईतील दुचाकींची संख्या तुलनेने अल्प आहे. तरी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी दुचाकींऐवजी इलेक्ट्रिक मोटरसायकल किंवा सायकल हा यावर उत्तम पर्याय ठरेल, असं मत व्यक्त केलं जात आहे.