मुंबई : हृदयविकाराचा धक्का एखाद्या व्यक्तीसाठी जीवघेणा ठरु शकतो. मात्र मुंबईत जन्माला आलेली चार महिन्यांची चिमुरडी याबाबतीत खरोखर सुदैवी म्हणावी लागेल. हृदयदोषासह जन्म झालेल्या विदिशावर 12 तासांची शस्त्रक्रिया झाली असून दोन महिन्यांच्या काळात तिला 6 हार्ट अटॅक्स आले. मात्र यातून ती बचावली आहे.


मुंबईतल्या परेलमधील वाडिया रुग्णालयात जन्म झालेल्या विदिशाला सध्या 'मिरॅकल बेबी' म्हणजे सुदैवी चिमुरडी असं म्हटलं जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे रुग्णालयच तिचं दुसरं घर झालं आहे. तिचा जन्म झाला तेव्हा तिच्या हृदयात दोष होता. त्यानंतर दोन महिन्यांच्या काळात तिला 6 हार्ट अटॅक्स आले. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने या बाळाबाबत वृत्त दिलं आहे.

कल्याणमध्ये राहणाऱ्या विशाखा आणि विनोद वाघमारे यांच्या चिमुकलीला पुढच्या काही दिवसांत डिस्चार्ज मिळेल. तिच्यावरील शस्त्रक्रियेसाठी 5 लाख रुपयांची गरज होती. वाघमारे दाम्पत्याने जेमतेम 25 हजारांची रक्कम जमवली, तर रुग्णालयातील दात्यांनी केलेल्या सढळ मदतीमुळे हे बिल चुकतं करता आलं.

'विदिशा दीड महिन्यांची होती. मी तिला फीडिंग करताना तिला उलटी झाली आणि ती बेशुद्ध पडली. आम्ही तिला हलवून शुद्धीवर आणलं तर तिची शुद्ध पुन्हा हरपली.' असं तिच्या आईने सांगितलं. विदिशाला तात्काळ स्थानिक नर्सिंग होममध्ये दाखल केली. तिथे त्यांना चिमुकलीला वाडियाला घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला.

तिच्या हृदयाची रचना सामान्य हृदयाच्या उलट असल्यामुळे गुंतागुंत निर्माण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तिच्यावर 14 मार्च रोजी शस्त्रक्रिया झाल्यावर हृदयाचं कार्य सुधारलं, मात्र फुफ्फुसांमध्ये तितकी सुधारणा दिसत नसल्याचं डॉक्टर म्हणतात.