कल्याण : बंगळुरुहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमधून 37 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर बुधवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली.

गाडीतील एका बर्थवर तिकीट निरीक्षकाला बेवारस खोका दिसल्यानं संशय आला. त्यानंतर रेल्वे पोलिसांना बोलावून हा खोका जप्त करण्यात आला. खोक्याची तपासणी केली असता, त्यात तब्बल 37 लाख रुपयांची रोकड आढळली.

यामध्ये 100, 500 आणि 2000 हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. ही सर्व रक्कम रेल्वेच्या आर्थिक विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

ज्या बर्थवर हे पैसे आढळले आहेत, ती सीट जनक पटेल नावाच्या व्यक्तीनं आरक्षित केली होती. त्यामुळे आता पोलिस संबंधित व्यक्तीची चौकशी करणार आहेत. हे सर्व पैसे हवालाचे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.