मुंबई : मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर बुधवारी स्टंट करण्यासाठी गेलेल्या दोन रशियन नागरिकांना वरळी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांपैकी एकजण पुलावरील स्टील केबलच्या साहाय्याने पायलॉन टॉवरवर चढला होता. तर दुसरा त्याचे व्हिडीओ आणि फोटो काढत होता. वांद्रे-वरळी सी लिंकवर अशाप्रकारे विनापरवाना कृत्य केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेले दोघेही रशियन सर्कसमध्ये काम करणारे असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


वर्षभरापूर्वी टुरिस्ट व्हिसावर आलेल्या मकसिम सचेरबकोव्ह (24) आणि वासिली कोलेसेनिकोव्ह (30) यांनी बुधवारी वांद्रे येथे टॅक्सी पडकली आणि ते वरळीच्या दिशेने आले. सागरी सेतूच्या मध्यभागी येताच त्यांनी टॅक्सी थांबवण्यास सांगितली. दोघेही टॅक्सीतून खाली उतरले आणि पायलॉन टॉवरच्या जवळ गेले. यातील एकजण स्टील केबलच्या साहाय्याने वर चढत होता, तर दुसरा पुलावरून त्याचे फोटो काढत होता. 


याचदरम्यान सी लिंकवरून जाणाऱ्या एक नागरिकाने याबाबतची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. पोलिस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच वरळी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मकसिम आणि वासिली या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. 


पोलिसांनी घातपातच्या अनुषंगाने चौकशी केली असता तसे काहीच संशयास्पद आढळले नाही. दोघेही सर्कसमधील कलाकार असून भारतामध्ये काम मिळेल त्या राज्यात फिरत असल्याचे समजले. वांद्रे येथील एका स्टुडिओमध्ये त्यांना काम मिळाले होते, यासाठी ते मुंबईत आले होते. उंच ठिकाणी, इमारती यांच्यावर जाऊन स्टंट करणे आणि त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणे हा दोघांचा छंद असल्याचे त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट तपासल्यानंतर लक्षात आल्याचे पोलिसांनी सांगितले.