मुंबई : एका छोट्याशा नजरचुकीमुळे एका व्यक्तीला आपला प्राण गमवावा लागला आहे. अतिशय धक्कादायक आणि हृदय हेलावून टाकणारा हा प्रकार असून मुंबईतल्या बोरिवली इथे घडला आहे. अमन यादव असं या मृत तरुणाचं नाव असून तो 19 वर्षांचा होता. हॉटेलजवळ पार्क असलेल्या कारच्या चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने जवळूनच दुचाकीवरुन जाणारा अमन दचकला आणि ताबा सुटून तो रस्त्यावर पडला. यानंतर मागून येणाऱ्या भरधाव बसने त्याला चिरडलं.
अमन यादव काल (9 एप्रिल) संध्याकाळी दुचाकी घेऊन काही कामानिमित्त घराबाहेर पडला होता. बोरिवलीतील दौलत नगर इथल्या उत्सव हॉटेल समोरुन जाताना त्याचा अपघात झाला. उत्सव हॉटेलसमोर काळ्या रंगाची कार पार्क होती. अमोल यादव इथून दुचाकीवरुन जात असतानाच या गाडीतील चालकाने दरवाजा उघडला. अचानक झालेल्या कृतीने अमन दचकला. त्यामुळे त्याचा दुचाकीवरील त्याचा ताबा सुटून तो गाडीसह रस्त्यावर पडला. मात्र त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव बेस्ट बसने त्याला चिरडलं. यात त्याचा जागीच मृत्यू झाला
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. परंतु नजर चुकीमुळे घडलेल्या या अपघातामुळे बोरीवली परिसरात एकच खळबळ माजली आहे. अमन यादव हा बोरिवलीचाच रहिवासी असून तो आंबा वाडी इथे राहत होता. अमनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. पोस्ट मॉर्टेमनंतर त्याचं पार्थिव कुटुंबीयांना सोपवण्यात येईल.