नवी मुंबई : नवी मुंबईतील एका खासगी कंपनीमधील 123 कामगारांचे बोगस कोरोना अहवाल बनवून कंपनीला चुना लावणाऱ्या दोन लॅब मालकांना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या लॅब मालकांनी अहवालावर थायरोकेअर या अधिकृत लॅबचे बनावट लेटरहेड वापरले होते.
रबाळेमध्ये असणाऱ्या प्रवीण इंडस्ट्रीजच्या 123 कामगारांच्या RTPCR टेस्ट करण्यासाठी ठाण्यातील मिडटाऊन लॅब आणि कल्याणमधील परफेक्ट हेल्थ पॅथालॉजी यांना बोलवण्यात आले होते. या दोन्ही लॅबचे थायरोकेअर लॅबबरोबर टायअप असल्याने त्यांच्याकडून कामगारांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता.
यानुसार प्रति चाचणीचे 650 रुपये या प्रमाणे 123 कामगारांचे पैसे दोन लॅबला देण्यात आले. यानंतर प्रवीण इंडस्ट्रीजला लॅबकडून मिळालेल्या कोरोना अहवालात सर्व कामगार निगेटिव्ह असल्याचे लिहून देण्यात आले होते. मात्र मिळालेल्या सर्व रिपोर्टचा QR Code एकसारखा असल्याने संशय आला. यानंतर थायरोकेअर लॅबमध्ये प्रविण इंडस्ट्रीच्या व्यवस्थापनाने चौकशी केली असता आपल्या लॅबमध्ये 123 कामगारांचे RTPCR सॅम्पल्स आले नसल्याचे सांगितले.
आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवीण इंडस्ट्रीजकडून रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रबाळे एमआयडीसी पोलिसांकडून बोगस लॅब रिपोर्ट तयार करुन देणाऱ्या महम्मद वसीम शेख, देविदास घुले या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी किती लोकांना बोगस कोरोना अहवाल दिले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.