मुंबई : गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, व्हॉट्सअपसह अनेक सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात हॉस्पिटलमधील स्ट्रेच आपोआप पुढे-मागे सरकताना दिसतो. विशेष म्हणजे हा व्हिडीओ मुंबईतील जे जे हॉस्पिटलमधील असल्याचेही बोलले जात आहे. यामागचं सत्य एबीपी माझाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.



वरील व्हिडीओनं अनेकांची झोप उडवली आहे. सध्या हा व्हिडीओ व्हॉट्सअप आणि फेसबुकवर व्हायरल होत आहे. स्ट्रेचर आपोआप चालत असल्याचं या व्हिडीओत दिसतं आहे.

या व्हिडीओचा आणखी एक दुसरा भाग आहे. एक व्यक्ती पाणी पिण्यासाठी आली आहे आणि त्याचवेळी त्याचं लक्ष या स्ट्रेचरकडे जातं. ती व्यक्ती या स्ट्रेचरला पकडण्याचा प्रयत्न करते. मात्र त्याचवेळी स्ट्रेचर पुन्हा जोरात पुढं जातो. त्यामुळं घाबरुन या व्यक्तीनंही इथून पळ काढल्याचं व्हिडीओतून दिसतं.

याहून अधिक धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडीओ मुंबईतल्या जे. जे. हॉस्पिटलमधील असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

कुणीही धक्का न लावता स्ट्रेचर कसा काय चालू शकतो, याची पाहणी करण्यासाठी एबीपी माझाचे प्रतिनिधी जे.जे. हॉस्पिटलमध्ये पोहोचले. जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

हा व्हिडीओ म्हणजे बदनामी करण्याचा डाव आहे. कृपया इथे गरीब पेशंट येतात. त्यामुळे अशाप्रकारे हॉस्पिटलची बदनामी करु नका, असं आवाहन तात्याराव लहाने यांनी केले आहे. शिवाय, हा व्हिडीओ जे जे हॉस्पिटलमधील नसून अर्जेंटिनामध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटातला असल्याचा दावाही लहानेंनी केला आहे.

जे. जे हॉस्पिटलमधील ज्या शवगृहातल्या परिसरातला हा व्हिडीओ असल्याच्या चर्चा होत आहे. त्या ठिकाणीही माझाच्या प्रतिनिधींनी फेरफटका मारला.

या व्हिडीओनं मुंबईसह राज्यभरातल्या रुग्णांच्या आणि सामान्यांच्याही मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. मात्र, या व्हिडीओबाबत सुरु असलेल्या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचं एबीपी माझाच्या पाहणीत समोर आलं. त्यामुळं तुमच्या व्हॉट्सअपवर हा व्हिडीओ आला असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करा.