मुंबई : माझी तूर अजून विकलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी वेश बदलून तूर विकून दाखवावी. मग तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, असं जाहीर आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. ते विधान परिषदेत बोलत होते.
“मला अर्थव्यवस्थेविषयी काही कळत नाही असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. मी शेतकरी आहे, व्यवसाय कधी केला नाही, कधी करेल असं वाटत नाही.”, असा टोलाही धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
...तर निवडणुकीत चित्र वेगळं असतं !
मुख्यमंत्र्यांचा बोलण्यात कोणीच हात पकडू शकत नाही. आम्ही निवडणुकीत तोंडावर पडलो असं मुख्यमंत्री म्हणाले. आम्हाला राजकारण करायचं असतं तर हिवाळी अधिवेशनात डिसेंबरपासून ते जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत शेतकरी आत्महत्यांवर रान पेटवलं असतं. मग कदाचित निवडणुकीचं चित्र वेगळं असतं.”, असे धनंजय मुंडे म्हणाले.
शिवसेनेवरही निशाणा
“शिवसेनेला खरच शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पाहीजे असेल, तर मुंबई महापालिकेचे 56 हजार कोटी रूपये फिक्स डिपॉझिट आहेत. ते पैसे राज्य सरकारकडे वळवून घ्यावेत. महापालिकेला व्याज देऊन 30 हजार कोटी कर्जमाफ होऊ शकत नाही का? त्यातून शिवसेनेचीही इमानदारी कळेल.”, असं म्हणत धनंजय मुंडेंनी शिवसेनेवर निशाणा साधला.
“मिली सजा जो मुझे वो किसी खता पे नही, मुझपे जुर्म साबीर हुआ वो वाफा का था, असं काहीसं मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना वाटलं असेल.”, असे धनंजय मुंडे म्हणाले.