मुंबई : निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर 5 अधिकाऱ्यांविरोधात दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्विटरवरुन दिली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो असा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने 300 कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचा या तक्रारीत म्हटलं आहे.


परिवहन मंत्री अनिल परब यांची प्रतिक्रिया
निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर 5 अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे. विभागातील अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे. मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून उच्च न्यायालयामार्फत CBI चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे. या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करीत असून, चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलीय.




या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. पोलीस उपायुक्त (क्राईम ब्रांच) आणि इतर दोन उपायुक्त या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पाच दिवसात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. दरम्यान गजेंद्र पाटील अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. ते 31 मे नंतर हजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.


मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाठराखण
दरम्यान राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अनिल परब यांची पाठराखण केली आहे. खालच्या स्तरावर काय होते याला मंत्री जबाबदार कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसंच "हे प्रकार चालूच राहणार, गुन्हा दाखल करायचा, नाहीतर कोर्टात जायचं हा जुना खेळ आहे. हे विरोधी पक्षाचं षडयंत्र आहे," असंही भुजबळ म्हणाले.