मुंबई : कोविड उपचारांमध्ये औषधांचा अनाठायी वापर टाळायला हवा. अतिरेकी औषधांमुळे रुग्णांवर याचे दुष्परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. म्युकरमायकोसीस सारखा आजार याच गोष्टींमुळे होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करताना या गोष्टींचा ध्यानात ठेवाव्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असली तरी धोका टळलेला नाही. आता तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 


आज महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मेडिकल एज्युकेशन विभागाचे डायरेक्टर डॉ. तात्याराव लहाने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री कोरोना रुग्णांवर उपचार करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.


काय म्हणाले मुख्यमंत्री?
गेल्या वर्षीच्या तुलनेत एक सकारात्मक बदल झाला आहे. मागली वर्षी कोरोनाची प्रचंड दहशत होती. डॉक्टर्ससुद्धा रुग्णालय उघडायला तयार नव्हते. त्यावेळी आपल्याकडे बेसिक गोष्टींचा तुटवडा होता. यावर्षी मात्र ही दहशत आता खूप कमी झालीय. जवळपास सर्वच डॉक्टरांनी आपले क्लिनिक उघडले आहेत. यावरुन आपण माझा डॉक्टर माझी जबाबदारी अशी संकल्पना आणली होती. यानुसार आता अनेक फॅमिली डॉक्टर कोरोना विरोधात मैदानात उतरले आहे.


लॉकडाऊन उघडायचा की नाही यावर आपण निर्णय घेणार आहे. पण, हा निर्णय घेताना सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. गेल्यावर्षीपेक्षा परिस्थिती थोडी वेगळी आहे. यावेळी कोरोनाचे वेगवेगळे स्ट्रेन निर्माण झाले आहे. यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत संसर्ग वेगाने पसरत आहे. आता पावसाळा येत असल्याने अधिक काळजी घेतली पाहिजे. कारण, पावसाळी आजार आणि कोरोना यांच्या लक्षणांमध्ये बरेच साध्यर्म आहे. कोरोना रुग्णांना वेळीच उपचार देणे गरजेचं आहे.


अनावश्यक औषधांचा वापर टाळायला हवा
कोविड उपचारांमध्ये औषधांचा अनाठायी वापर टाळायला हवा. अतिरेकी औषधांमुळे रुग्णांवर याचे दुष्परिणाम समोर येताना दिसत आहे. म्युकरमायकोसीस सारखा आजार याच गोष्टींमुळे होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करताना या गोष्टींचा विचार करायला हवा. यात कोविडचा रुग्ण लवकरात लवकर ओळखून त्याला उपचार देणं महत्वाचे आहे. घरी उपचार करताना या गोष्टींची जास्त काळजी घेणे महत्वाचे आहे.


कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती तुमच्याकडे आली तर त्याने लस घेतली का? घेतली असेल तर कोणती होती? याची माहिती आपल्याकडे ठेवा. कारण, कोणती लस किती प्रभावी आहे, याची माहिती आपल्याला मिळेल. भविष्यात 100 वर्षानंतर असा आजार आला तर हा डेटा खूप उपयुक्त ठरणार आहे. रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत का? किती प्रमाणात तयार झाल्यात? याची माहितीही आपल्याकडे असायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले आहे.