मुंबई : ‘अतिथी देवो भव’ म्हणणाऱ्या भारतीयांची मान शरमेने खाली घालवणारी घटना मुंबईत घडली आहे. स्वतःला टूरिस्ट गाईड म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने परदेशी पर्यटक महिलेवर बलात्कार केला. 37 वर्षीय इटालियन पर्यटक महिलेवर या व्यक्तीने बलात्कार केला.

इटालियन पर्यटक महिला 11 जून रोजी बंगळुरुहून मुंबई दर्शन करण्यासाठी आली होती. त्यानंतर 14 जून रोजी गेट वे इंडिया बघून आल्यानंतर मुंबई दर्शन करण्यासाठी टॅक्सी, बस शोधात असताना स्वतः ला गाईड म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीच्या ती संपर्कात आली. संपूर्ण मुंबई दर्शन करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीने घेतली.

मात्र, त्याच दिवशी रात्री साडे आठच्या सुमारास त्या व्यक्तीने टॅक्सी बूक करून ती टॅक्सी जुहूजवळ एका वाईन शॉपजवळ थांबवली. त्या महिलेला जबरदस्ती करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचं महिलेने तिच्या तक्रारीत सांगितलं आहे. त्यानंतर त्या महिलेने या व्यक्तीपासून आपली सुटका करून दक्षिण मुंबईतील आपलं हॉटेल गाठलं आणि दुसऱ्या दिवशी मुंबईहून बंगळुरुला राहत असलेल्या आश्रमात गेली.

त्यानंतरही त्या व्यक्तीने तिला इंस्टाग्रामवर मेसेजेस करून पत्ता विचारून त्रास द्यायला सुरुवात केली. अखेर पीडित महिलेने दिल्लीला जाऊन इटालियन दुतावासाशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली.

शुक्रवारी रात्री मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात आयपीसी 376(2)  गुन्हा दाखल करून मुंबई पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.