मुंबई: मुंबई, नवी मुंबई, कल्याण, मीरा भाईंदर परिसरात टोरेस ज्वेलरी नावानं कार्यालय उघडून गुंतवणुकीच्या पाँझी स्कीमच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करण्यात आली. गेल्या सोमवारी टोरेस घोटाळा उघड झाला. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी फरार असून दोन जणांविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणी तपास करण्यात येत आहे.
टोरेस घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून विविध ठिकाणाहून 25 कोटींहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांकडून काही ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. टोरेसनं लकी ड्रॉ अंतर्गत वाटल्या जाणाऱ्या 14 महागड्या गाड्या देखील जप्त केल्या आहेत.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेसच्या दादर कार्यालयाच्या सीईओचा शोध सुरु आहे. दादरच्या कार्यालयाचा सीईओ तौसिफ रियाज होता. तौसिफ रियाज गुंतवणूकदारांच्या आधार कार्डच्या झेरॉक्सचं काम करत असे. कंपनीला दादरचं कार्यालय 25 लाख रुपयांमध्ये उपलब्ध केल्यानं टोरेस कंपनीनं मुंबई विभागाचं सीईओपद दिलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे तौसिफ रियाजचं शिक्षण दहावी नापास आहे.
नवी मुंबई, मुंबई तसेच परिसरातील अन्य 5 ठिकाणी शाखा टोरेस कंपनीने लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केल्या नंतर एपीएमसी मधील टोरेस कंपनी कार्यालयावर कारवाई करण्यात आली. कार्यालयाचा पंचनामा करीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण जवळपास 1 कोटी 90 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरचा ऐवज हा तुर्भेतील टोरेस कार्यालयाच्या तळमजल्यात असलेल्या लॉकरमध्ये जमा करून ठेवला होता.
गंतवणूक योजनांवर लक्ष ठेवा
टोरेस घोटाळा प्रकरणानंतर सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या भागातील गुंतवणूक घोटाळा किंवा गुंतवणूक फसवणुकीच्या योजनांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय टोरेस घाटाळा प्रकरणी सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या भागात झालेल्या गुंतवणूक घोटाळ्यांची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यालयात पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात जी कारवाई बाकी असेल ती पूर्ण करण्यात यावी, अशा देखील सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्लॅटिनम हर्न प्रायवेट लिमिटेड कंपनीनं दादरमध्ये टोरेस ज्वेलरी नावानं कार्यालय उघडलं होतं. त्यानंतर पाँझी स्कीम सुरु करुन गुंतवणूकदारांना प्रत्येक आठवड्याला 4 ते 10 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, कंपनीनं सुरुवातीला पैसे दिले त्यानंतर पैसे मिळणं बंद झालं अन् कंपनी गायब झाली.
इतर बातम्या :