Toll Free For Light Vehicles: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं (Maharashtra Government) घोषणांचा धडाका लावला आहे. अशातच मुख्यमंत्र्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर (Five Toll Plaza) हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी केली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांच्या टोलमाफीच्या निर्णयानंतर ABP माझाला आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, "गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरु होता त्याला यश मिळालं आहे, उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली. हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा,  नाहीतर निवडणुकीनंतर त्याचा बोजा जनतेवर माराल..." 


आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. अशातच त्यापूर्वी महायुती सरकारच्या वतीनं राज्यातील जनतेसाठी मोठ्या घोषणांचा सपाटा लावण्यात आला आहे. आजही राज्यमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आला. या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. मुंबईत प्रवेश करताना लागणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना आता टोल लागणार नाही. संपूर्ण टोल राज्य सरकारच्या वतीनं माफ करण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 


याआधी सरकारने कोणकोणते निर्णय घेतले?


राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकतो. त्याआधी राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे. याआधी महायुती सरकारने समाजातील वेगवेगळ्या घटकांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने अनेक लोकप्रिय निर्णय घेतले आहेत. सरकारने राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळपास दुप्पटे केले आहे. या निर्णयाचा जवळपास 50 हजार होमगार्ड्सना फायदा होणार आहे. यासह सरकारने राज्यातील अनेक आयटीआय संस्थांची नावे बदलली आहेत. या संस्थांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. राज्य सरकारने राज्यातील मदरशांत शिकविणाऱ्या शिकक्षांचे मानधनही दुप्पट केले आहे.


पाहा व्हिडीओ : Raj Thackeray on Mumbai Toll Free For Light Vehicle : आमच्या लढ्याला यश, राज ठाकरेंची प्रतिक्रिया