मुंबई :  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar)  नेते बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी (Baba Siddique)  आता आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयित सूत्रधार शुभम लोणकर (Shubham Lonkar)  याचा भाऊ प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्राँचने पुण्यातून अटक केली आहे. शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकर यांनी धर्मराज कश्यप आणि शिवानंद या दोघा आरोपींना बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी निवडलं असल्याचा पोलिसांना संशय आहे.  शुभम लोणकरच्या चौकशीसाठी क्राईम ब्रांचची टीम पुण्याला रवाना झाली आहे. पण शुभम लोणकर कोण आहे? याविषयी जाणून घेऊया.


बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला प्रविण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर हे दोघे सोशल मीडियाद्वारे काही वर्षांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी जोडले गेले. बिश्नोई टोळीला हत्यारे पुरवल्या बद्दल शुभम लोणकरला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. शुभम लोणकर त्याच्या मूळ गावी होता तर प्रविण लोणकरने पुण्यातील वारजे भागात डेअरी आणि किराणा विक्रीचे दुकान सुरू केले होते. शुभमच्या सांगण्यावरुन बाबा सिद्दिकींच्या हत्येत सहभागी असलेले  धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम हे एकामागोमाग हरियाणा आणि उत्तर प्रदेशातुन पुण्यात येऊन राहिले‌ . प्रविण लोणकरने त्याचे दुकान असलेल्या वारजे भागातच एका भंगार विक्रेत्याकडे त्यांना काम मिळवून दिले होते. पुण्यात राहून अनेकदा त्यांचे मुंबईला येणे जाणे सुरू होते आणि सिद्दिकींच्या हत्येचा कट रचला जात होता. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुण्यातून त्यांचा मुक्काम  मुंबईला हलवला होता.


 बिश्नोई गँगशी सूत कसं जुळलं?


शुभम लोणकरला लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंध असल्याच्या आरोपावरुन आणि शस्त्र पुरवल्याच्या आरोपावरुन फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती‌. त्याची बातमी एबीपी माझाने त्यावेळी  दाखवली होती. त्या बातमीचा स्क्रीन शॉट प्रवीण लोणकरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यावेळी शेअर केला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या घडवून आणली होती. त्या प्रकरणात पंजाब पोलीसांनी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधव , जुन्नर तालुक्यातील नवनाथ सुर्यवंशी आणि सिद्धेश कांबळे यांना अटक केली होती. हे तिघेही लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे प्रभावित होऊन बिश्नोई गँगशी जोडले गेले होते. 


बिश्नोई गँगचे ऑनलाईन व्हर्जन 


तुरुंगात असलेला लॉरेन्स तर परदेशात असलेले त्याचे साथीदार अनमोल बिश्नोई आणि गोल्डी ब्रार हे सोशल मीडियाचा उपयोग करुन नवीन तरुणांची टोळीत भरती करतात आणि त्यांच्याकडून हवा तो गुन्हा करून घेतात. त्यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागातील अनेक तरुण बिश्नोई गँगचे सदस्य बनलेत ज्यांचे आधी कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. त्यामुळे अशा गुन्हेगारांना आवरणे आणि त्यांच्याकडून होणारे गुन्हे रोखण्याचे  मोठे आव्हान पोलीस आणि तपास यंत्रणांसमोर आहे.अंडरवर्लडच हे ऑनलाईन व्हर्जन आहे.


हे ही वाचा : 


Baba Siddique Murde Case : 'ऑसिफिकेशन टेस्ट'नंतर आरोपी धर्मराजच्या वयाचा उलगडा, पण ही टेस्ट आहे तरी काय?