मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांच्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला. या प्रकरणाशी निगडित आतापर्यंत सहा आरोपींची नावे समोर आली आहेत. यापैकी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. सलमान खानला मदत करणाऱ्या प्रत्येकाला हिशोब द्यावा लागेल, अशा आशयाची पोस्ट या टोळीशी संबंधित असलेल्या एका आरोपीच्या फेसबुकर पोस्ट करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने मी अल्पवयीन असल्याचा दावा केल्यानंतर न्यायालयाने त्याची ऑसिफिकेशन टेस्ट (Ossification Test) करण्याचा आदेश दिला. याच पार्श्वभूमीवर ऑसिफिकेशन टेस्ट काय असते? हे जाणून घेऊ या..


आरोपीने नेमका काय दावा केला होता? 


बाबा सिद्दिकी यांच्यावर एकूण तिघांनी गोळीबार केला होता. पोलिसांनी यापैकी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यातील तिसरा आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने गुरनैल सिंह या 23 वर्षीय आरोपीला न्यायालयाने 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर धर्मराज कश्यप (Dharmraj kashyap)  या आरोपीने मी अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. माझ्या अशिलाचे वय हे 17 वर्षे आहे. त्यामुळे त्याला अल्पवयीन म्हणून ग्राह्य धरण्यात यावं, असा दावा कश्यपच्या वकिलांनी केला होता. या दाव्यानंतर न्यायालयाने त्याची ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे निर्देश दिले होते. या टेस्टनंतर धर्मराजचे वय समजण्यास मदत होणार होती. 


टेस्टमधून नेमकं काय समोर आलं? 


न्यायालयाच्या निर्देशानंतर आरोपी धर्मराजची ऑसिफिकेशन टेस्ट करण्यात आली. या टेस्टनुसार आरोपी हा अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता न्यायालयाने त्याला सज्ञान असल्याचं ग्राह्य धरलं आहे. धर्मराजला गुरनेल सिंहप्रमाणेच 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. 


ऑसिफिकेशन टेस्ट काय असते? (What is Ossification Test)


ऑसिफिकेशन हा एक इंग्रजी शब्द आहे. मानवी शरिरात हाडे तयार होणे तसेच त्यांचा विकास होण्याच्या प्रक्रियेला ऑसिफिकेशन म्हटलं जातं. बाल्यावस्था ते किशोरवयापर्यंत मानवी हाडांचा विकास होत असतो. किसोरवयानंतर ही वाढ थांबवते. या काळात मानवी हाडे टणक होतात. हाडांच्या मॅट्रिक्समध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आदी घटक जमा होतात. मानवाचे वय जसे- जसे वाढते तसे-तसे हाडांचा विकास मंदावतो. परिणामी कालांतराने हाडे ठिसूळ होतात आणि हाडे तुटण्याची शक्यता वाढतो. मानवी हाडांच्या विकासाची ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही बाब लक्षात घेऊन हाडांच्या ऑसिफिकेशननुसार तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे वय ठरवणे शक्य होते.    


ऑसिफिकेशन टेस्ट कशी केली जाते?


ऑसिफिकेशन टेस्टला इपिफायजल टेस्ट असंही म्हटलं जातं. या चाचणीच्या माध्यमातून शरीरातील विशिष्ट हाडांचा एक्स-रे काढला जातो. विशेषत: क्लॅव्हिकल, स्टर्नम, पेल्विस हाडांचा एक्स-रे काढला जाते. या हाडांचे ऑसिफिकेशन किती झाले आहे, याचा अभ्यास केला जातो. वयानुसार या हाडांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असतो, म्हणूनच ऑसिफिकेशन टेस्टसाठी या हाडांच एक्स-रे काढला जातो. 


दरम्यान, ऑसिफिकेशन टेस्ट ही एखाद्या व्यक्तीचे वय ठरवण्यासाठीची निर्दोष अशी पद्धत नाहीये. एखाद्या व्यक्तीमध्ये ऑसिफिकेशनची प्रक्रिया ही जलद असू शकते तर दुसऱ्या व्यक्तीमध्ये हीच प्रक्रिया जलद गतीने होऊ शकते. आजार, दुखापत, कुपोषण आदी गोष्टींमुळे हाडांच्या ऑसिफिकेशनवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच ऑसिफिकेशन टेस्ट ही एखाद्या व्यक्तीचे वय ठरवण्यासाठीची निर्दोष प्रक्रिया नाही. 


हेही वाचा :


सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध; कोर्टाकडून 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी