मुंबई: नवी मुंबई विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात 'तिसरी मुंबई' (Tisari Mumbai) नावाचे नवे शहर उभारण्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. हे शहर अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूद्वारे (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) मुंबईशी जोडले जाईल असं हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. 


तिसरी मुंबई म्हणून उदयास येणाऱ्या पनवेल, उरण तालुक्यातील 23 गावांमध्ये सिडको 12 हजार कोटी रूपये खर्च करून रस्ते उभारणार आहे. नैना क्षेत्र असलेल्या या 23 गावांचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी सिडकोने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून त्याला मान्यता मिळाल्यानंतर आता त्याचे टेंडर काढण्यात येणार आहे. 


चौक आणि सिग्नल विरहित आधुनिक डिझाईनचे रस्ते


नैना क्षेत्रातील 1 ते 12 असे सर्वच टीपीएस योजनेतील रस्त्यांचे जाळे उभारणीसाठी मार्गातील सर्व अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. रस्ते बांधताना कुठेही सिग्नल यंत्रणा किंवा चौक येऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे रस्ते सरळ रेषेत असतील आणि ज्या ठिकाणी गरज आहे तिथे उड्डाणपूल किंवा अंडरपास बनवला जाणार आहे. यामुळे चौक आणि सिग्नल विरहित आधुनिक डिझाईनचे रस्ते सिडको तयार करणार आहे. 


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे. विमानतळाच्या पुर्वेला असलेल्या पनवेल, उरण तालुक्यातील 23 गावांचा विकास सिडको नैना योजनेअंतर्गत करणार आहे. या भागाला तिसरी मुंबई म्हणून सुद्धा ओळखले जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील पेण , खालापूर , कर्जत परिसरात सिडको नैना योजनेतून भविष्यात विकास करणार आहे. पहिल्या टप्यात फक्त पनवेल आणि उरण तालुक्यातील 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे. 


12 नोडची विकासकामे एकाच टप्प्यात होणार


नैना क्षेत्रातील विकासकामे वेगाने होत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत स्थानिक गावकऱ्यांनीही नाराजी व्यक्त करत नैना प्रकल्पाला विरोध करीत आहेत. सिडकोकडून नविन क्षेत्राचा विकास होताना एकसंघ न होता तुकड्या तुकड्यात केला जातो. यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त असलेल्या शेतकर्यांच्या भुखंडांना योग्य तो भाव मिळत नाही. त्यामुळे यावर विशेष लक्ष देत सिडको आता नैना भागातील 12 नोडची विकासकामे टप्याटप्यात न करता एकाच टप्प्यात हातात घेणार आहे. 


याचा आराखडा तयार करण्यासाठी सिडकोने खाजगी कंपनीला काम दिले आहे. या संपूर्ण कामासाठी सिडकोला साधारण 12 करोड रूपये खर्च अपेक्षित आहे. 


ही बातमी वाचा :