मुंबई: मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) पाकिस्तानातील कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातमी संपूर्ण देशात खळबळ उडाली. दाऊदला कराचीमध्ये एका अनोळखी व्यक्तीने विष दिलं, त्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला गंभीर अवस्थेत कराचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियामध्ये प्रसारित झालं आणि मुंबईत संपूर्ण अंडरवर्ल्डमध्ये चर्चा सुरु झाली. या घटनेला अधिकृत दुजोरा मात्र मिळालेला नाही. पण दाऊद दोन दिवसांपासून रुग्णालयात दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून त्यावर पाकिस्तानसह भारतामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.  


काही पाकिस्तानी चॅनल्स, पत्रकार आणि यूट्यूबर्सने कराचीमध्ये इंटरनेट बंद केल्याचा दावा केला. प्रश्न उपस्थित झाले की दाऊदची ही बातमी दाबण्यासाठी हे केलं गेलं आहे का? याआधीही दाऊदला अनेक गंभीर आजार झाल्याचा दावा करण्यात आला होता. पण यंदा दाऊदला हॉस्पिटलमध्ये कडक सुरक्षेत ठेवण्यात आले असून त्याच्या मजल्यावर तो एकटाच पेशंट आहे. केवळ रुग्णालयातील अधिकारी आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांना त्या मजल्यापर्यंत प्रवेश असल्याचंही बोललं जात आहे.


दाऊदच्या जवळच्या नातेवाईकांनी केलं खंडन


मुंबई पोलीसांनी या माहिती संदर्भात चौकशी सुरु केली. मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीट आणि टेमकर गल्ली जिथे दाऊदचं घर आहे, जिथे छोटा शकील राहतो तिथे जाऊन माहिती घेतली. पोलिसांनी दाऊदचा भाचा अलिशाह पारकर आणि साजिद वागले यांच्याकडून चौकशी केली असताना या बातमीचं त्यांनी खंडन केलं आहे. 


मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा एकामागून एक खात्मा


पण दाऊदच्या बातमीचं गांभीर्य यासाठी आहे की मागील काही महिन्यांमध्ये भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि पाकिस्तानमध्ये लपलेले दाऊदचे साथीदार निवडकपणे संपवले जात आहेत. या वर्षात भारताचे अनेक शत्रू शेजारील देशांमध्ये मारले गेले आहेत. असं बोललं जातं आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय एजन्सी (Indian Intelligence Agencies) या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा पाकिस्तानमध्येच खात्मा करत आहे. 


दाऊद इब्राहिमच्या 'डी कंपनी'च्या एका गुंडाची 23 ऑक्टोबरला हत्या करण्यात आली आहे. मोहम्मद सलीम हा कराचीतील दिल्ली कॉलनी येथील रहिवासी होता. सलीमची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह दर्गा अली शाह सखी सरमस्तजवळील लियारी नदीत फेकून दिला होता. लियारी पोलीस स्टेशनने सलीमचा मृतदेह नदीतून बाहेर काढला आहे. 


पठाणकोटचा सूत्रधार मारला गेला


अलीकडेच पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार शाहीद लतीफ मारला गेला. दुसरा दहशतवादी आणि आयएसआय एजंट मुल्ला बहूर उर्फ ​​होर्मुझ होता, जो पाकिस्तानमध्ये अज्ञात लोकांच्या गोळ्यांना बळी पडला. 


यानंतर गेल्या आठवड्यात दाऊद मलिक मारला गेला. तो 'जैश-ए-मोहम्मद' या जागतिक दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा जवळचा असल्याचे बोलले जाते. 'जैश-ए-मोहम्मद' व्यतिरिक्त दाऊद मलिक लष्कर-ए-जब्बार आणि लष्कर-ए-जंगवीशीही संबंधित होता.


20 फेब्रुवारीला रावळपिंडीत बशीर अहमद पीर उर्फ ​​इम्तियाजवर गोळ्या झाडण्यात आल्या. केंद्र सरकारच्या दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश होता. पाकिस्तानातून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचे त्याचे काम होते. आयएसआयने त्याला हिजबुल मुजाहिद्दीनचे लॉन्च पॅड हाताळण्याची जबाबदारी दिली होती.


गेल्या महिन्यात 'लष्कर-ए-तैयबा'चा प्रमुख हाफिज सईदचा जवळचा सहकारी अबू कासिम याला रावळकोटमध्ये गोळ्या घालण्यात आल्या होत्या. खलिस्तान कमांडो फोर्सचा दहशतवादी आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड परमजीत सिंग पंजवाड याचीही पाकिस्तानात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. याशिवाय हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख दहशतवादी बशीर मीर उर्फ ​​इम्तियाज आलम आणि जैशचा दहशतवादी जहूर मिस्त्री यांचाही पाकिस्तानात खात्मा झाला.


दोन खलिस्तानी दहशतवाद्यांचा चार दिवसांत खात्मा 


पण भारत विरुद्ध कट रचणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा परदेशातही केला गेला. काही महिन्यांपूर्वी भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या दोन मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवाद्यांना '120' तासांत ठार मारणे ही मोठी घटना होती. पहिला खलिस्तानी दहशतवादी अवतार सिंग खांडा मारला गेला. 15 जून रोजी बर्मिंगहॅम येथील रुग्णालयात त्याचं निधन झाले. त्याने लंडनमधील भारतीय दुतावासाचा राष्ट्रध्वज खाली करून अपमान केला होता. 


यानंतर 19 जून रोजी कुख्यात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरचा कॅनडात मृत्यू झाला. दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांच्या गोळ्यांचे तो लक्ष्य बनला. या दोन्ही दहशतवाद्यांचा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवादी यादीत समावेश होता.


या सगळ्या घडामोडींमुळेच भारताने आपल्या दुश्मनांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन 'ऑल आउट' तर सुरु केलं नाही ना आणि याच ॲापरेशनचं मुख्य टार्गेट दाऊद आहे का या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील.


ही बातमी वाचा: