मुंबई : कळंबोली येथील सुधागड शाळेच्या बाहेर एका हातगाडीवर बॉम्ब ठेवण्यात आला होता. या बॉम्बचा स्फोट होण्याआधीच शाळेच्या दोन शिपायांनी त्याचे टायमर सॉकेट तोडल्याने मोठा अनर्थ टळला. हातगाडीवर ठेवण्यात आलेल्या बॉम्बला टायमर लावण्यात आले होते. त्यावर दुपारी 1 ची वेळ निश्चित(सेट ) करण्यात आली होती. परंतु दुपारी 12.30 वाजता शाळेचे शिपाई गोपाळ कुंभार आणि विश्वकर्म या दोघांनी टायमर बॉम्बपासून वेगळे केले. त्यामुळे या बॉम्बचा स्फोट झाला नाही.

कळंबोलीत सुधागड शाळेजवळ काल (सोमवार) टाइम बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली होती. एका लोखंडी पेटीमध्ये सिमेंटचा बॉक्स ठेवण्यात आला होता. त्याला बाहेरून घड्याळ लावून वायरींग करुन टायमर जोडण्यात आले होते. परंतु बॉम्ब आणि टायमरमधील कनेक्शन तोडल्यामुळे त्याचा स्फोट झाला नाही. परिणामी मोठा अनर्थ टळला.

टायमर आणि बॉम्बमधील कनेक्शन जरी तोडले असले तरी बॉम्ब निकामी केला नव्हता. त्यामुळे रात्री 8 वाजेपर्यंत बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरु होते. बॉम्ब निकामी करण्यासाठी तळगांव येथील सीआरपीएफच्या बॉम्बशोधक पथक आणि मुंबईच्या पथकांना पाचारण करण्यात आले.

बॉम्बशोधक पथकाने स्कॅनिंग मशीन लावून सिमेंटचा बॉक्स तपासला. परंतु बॉम्ब निकामी करता आला नाही. परिणामी बॉम्बशोधक पथकाने रात्री 2 वाजता तळोजा एमआयडीसीमधील एका निर्जनस्थळी बॉम्ब नेला. तिथे त्याचा स्फोट झाला.

दरम्यान सिमेंट बॉक्समध्ये कोणत्या प्रकारची स्फोटके ठेवली होती. याबाबतची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. बॉम्बचे अवशेष फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. एटीएसचे प्रमुख देवेन भारती यांनी घटनास्थळी भेट देवून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे.

दरम्यान, शाळेसमोर बॉम्ब ठेवणाऱ्या संशयिताचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.