मोदी सरकार राम मंदिर बांधायला उशीर करत आहे, सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर
एबीपी माझा वेब टीम | 18 Jun 2019 08:32 PM (IST)
राम मंदिर बांधण्यास मोदी सरकारच उशीर करत असल्याचे विधान करत भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे.
Getty Images)
मुंबई : राम मंदिर बांधण्यास मोदी सरकारच उशीर करत असल्याचे विधान करत भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. स्वामी यांनी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना स्वामी यांनी राम मंदिर बांधण्यास सरकार दिरंगाई करत असल्याचे विधान केले आहे. उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावरून नुकतेच परतले आहेत. त्यामुळे स्वामी आणि ठाकरे यांच्यातली ही भेट राम मंदिराच्या मुद्द्यावर अतिशय महत्त्वाची होती. उद्धव ठाकरे यांच्याशी राम मंदिर निर्माणाबाबत चर्चा केली असल्याचे या भेटीनंतर स्वामींनी सांगितले. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, राम मंदिर बांधण्यास सरकारला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. जमिनीचे राष्ट्रीयकरण झालेले आहे. केंद्र सरकारकडे या जमिनीचा मालकी हक्क आहे. सरकारला वाटेल तेव्हा या जमिनीवर सरकार राम मंदिराचे बांधकाम करु शकतं. स्वामी यांनी सांगितले की, राम मंदिर बांधण्यासाठी केवळ ज्या लोकांचा जमिनी मंदिराच्या बांधकामासाठी वापरणार आहोत, त्यांना त्याचा मोबदला देणे आवश्यक आहे. तसेच मोबदला दिला असल्याचे कागदपत्र न्यायालयात सादर केल्यानंतर कोणत्याही क्षणी सरकार राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करु शकतं. स्वामी म्हणाले की, राम मंदिराबाबत कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चुकीचा सल्ला दिला आहे. परंतु मी मोदींना त्याबाबत पत्राद्वारे कळवले आहे. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबतही त्याच विषयावर माझे बोलणे झाले आहे. सरकार केव्हाही राम मंदिर उभारु शकतं. परंतु सरकार या कामात दिरंगाई करत आहे.