मुंबई : महाराष्ट्र आणि गणेशोत्सव हे एक समीकरणचं, संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. मुंबई आणि पुणे ही शहरं गणोशोत्सवाचं केंद्र, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. पुण्यातील मानाचे गणपती आणि मंबईतील मोठ्या गणेशमूर्ती आणि आकर्षक देखावे हे गणेशोत्सवाचं आकर्षण असतं. येथे अनेक भाविक गणपती दर्शनासाठी गर्दी करतात. पण सध्या राज्यातील कोरोनाचं सावट पाहता सोशल डिस्टन्सिंग पाळण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्याबाबत अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत.


सर्व भाविकांना गणेशोत्सवापर्यंत राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन, राज्य कोरोनामुक्त होणार असा विश्वास आहे. तसेट भाविकांप्रमाणेच बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीला विश्वास आहे. त्यामुळे गणेशोत्सव कोणत्याही परिस्थितीत साजरा होईल असा आत्मविश्वास व्यक्त करत आहेत. मात्र दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा मात्र साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहीबावकर यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्याची तयार करा असं सांगितलं आहे. पण दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात न करता अत्यंत साधेपणाने करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कारण कोरोनानंतरही आपल्यापैकी प्रत्येकाला काळजी घेणं गरजेचं आहे.


पाहा व्हिडीओ : यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा; गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन



यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलताना नरेंद्र दहीबावकर यांनी सांगितलं की, 'काही वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली होती. त्यानंतरही लोकांना आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणून साधेपणाने 11 दिवस गणेशोत्सव साजरा केला होता.' त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, 'गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लोकांचा तसंच कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालणं योग्य नाही. संकटाच्या काळात गणेशोत्सव मंडळांनी नेहमीच प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस तसंच पालिकेवर मोठा ताण आहे. यामुळे यावेळीही गणेश मंडळं आपली मदतीची परंपरा कायम ठेवणार आहेत. लोकांना कमी गर्दी करण्याचं आवाहन करण्यात येणार असून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.'


दरम्यान, कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगभरात हातपाय पसरले आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतातही कोरोनाचा कहर पाहायला मिळतो. भारतातील सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्र राज्यात आहेत. अशातही मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा सर्वाधित प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. देशात लॉकडाऊन लागू होऊन 40 पेक्षा जास्त दिवस उलटले आहेत, तरिही महाराष्ट्रातील 14 जिल्हे अद्याप रेड झोनमध्ये आहेत.


संबंधित बातम्या :


विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून कुणाची वर्णी लागणार? अनेकजण इच्छुक 


मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आरोग्य सेविकांना हवा 50 लाखांचा विमा; हायकोर्टात याचिका


मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढतोय; आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू