मुंबई : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढणार आहे. या नऊपैकी राष्ट्रावादी काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या दोन जांगासांठी अनेकजण इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे. अमोल मिटकरी, महेश तपासे, नजिब मुल्ला, रुपाली चाकणकर यांच्यासह, हेमंत टकले आणि शशिकांत शिंदे यांचही नाव चर्चेत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे 27 मे 2020 पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणं आवश्यक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विधान परिषदेच्या या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागा भरण्याची विनंती केली होती. त्यानुसार ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीमुळे गणितं बदलली
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीची गणितं बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा जिंकणाऱ्या भाजपला आता विधानपरिषद निवडणुकीत तुलनेनं कमी जागांवर संधी मिळणार आहे. विधानसभेचं पक्षीय बलाबल पाहता शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेसला एक जागा सुटू शकते. तर, भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळे महाविकासआघाडीला पाच आणि भाजपला चार जागा मिळणार असून 21 मे रोजी पार पडणारी विधानसभेची निवडणूक बिनविरोधच पार पडणार अशी चिन्ह दिसून येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक इच्छूक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या दोन जांगासांठी अनेकजण इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे. अमोल मिटकरी, महेश तपासे, नजिब मुल्ला, रुपाली चाकणकर यांच्यासह, हेमंत टकले आणि शशिकांत शिंदे यांचंही नाव चर्चेत आहे. यात हेमंत टकले यांना विधानपरिषदेचा तर, शशिकांत शिंदे यांना विधानसभेचा अनुभव गाठीशी आहे. हेमंत टकले यांचा विधानपरिषेदचा कार्यकाल नुकताच संपला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी दिली जाते का? ते पहावे लागणार आहे. तर शशिकांत शिंदे यांचा 2019 च्या विधानसभेत पराभव झाला आहे. त्यामुळे त्याचं पुनर्वसन होणार का? की नवीन चेहऱ्याला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अनेक इच्छूक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोणाला देणार संधी? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आजचं शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे.
निवडणूक विधानपरिषदेची : शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावं निश्चित